IND vs ENG : ‘…तर प्रसिध कृष्णा अधिक मेडन ओव्हर्स टाकू शकेल’, भारताच्या माजी गोलंदाजाचा दावा

IND vs ENG 2nd Test Match Updates : जर जसप्रीत बुमराह पुढील आठवड्यात बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही, तर भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत इतर वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या लाईन आणि लेंथवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारताला किती नुकसान होऊ शकते याची झलक लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्याच्या ६५ व्या आणि ८२ व्या षटकांदरम्यान दिसून आली. यावेळी बुमराहने गोलंदाजी केली नाही. इंग्लंडने हा सामना पाच गड्यांनी जिंकून ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांची आवश्यकता होती. लढतीतील ६५ व्या षटकापर्यंत इंग्लंडची स्थिती ४ बाद २८६ अशी होती. बुमराहने ६५ व्या षटकापर्यंत १९ षटके टाकताना केवळ ५७ धावा दिल्या होत्या. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. यावेळी इतर गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी टिच्चून सामना केला. साधरण ८० षटकांनंतर नवीन चेंडू घेण्यात येतो. यासाठी कर्णधार शुबमनने बुमराहला राखून ठेवले. हा निर्णय बुमराहच्या वर्कलोड व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून देखील योग्य होता. मात्र, नवीन चेंडू हाती येईपर्यंत इंग्लंडने ५ बाद ३४९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे नवीन चेंडू मिळून देखील बुमराह वेगळे काही करु शकला नाही.
सिराज-प्रसिधवर भारताची धुरा –
पुढील अठवड्यात दुसरी कसोटी सुरु होणार आहे. अशा वेळी कदाचित वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराह या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही. असे झाल्यास भारताचे इतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांना परिस्थितीनूसार गोलंदाजी करावी लागेल. यांनी तिघांनीही पहिल्या कसोटीत तुकड्या तुकड्यात चांगली कामगिरी केली होती. आता विशेषतः सिराज आणि प्रसिध यांना चांगली कामगिरी करावी लागेल. त्याना विशेषतः त्याच्या लाईन आणि लेंथवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
हेही वाचा – ZIM vs SA : लुआन ड्रे प्रीटोरियस आफ्रिकेचा नवा सुपरस्टार! पदार्पणातच मोडला ६१ वर्षांचा जुना विक्रम
शैलीत किरकोळ बदल आवश्यक –
भारताचा माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेशला असा विश्वास आहे की प्रसिध कृष्णाने त्याच्या शैलीत काही किरकोळ बदल केले तर तो अजून चांगली कामगिरी करू शकतो. गणेशने पीटीआयला सांगितले की, प्रसिध नेहमीच विकेट्स घेणारा गोलंदाज राहिला आहे, परंतु त्याला काही सातत्यपूर्ण गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. तो ज्या लेंथवर गोलंदाजी करतो, त्यावरच लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे त्याला चेंडू जुना झाल्यानंतर अधिक मेडन ओव्हर्स टाकण्यास मदत होईल. इंग्लंडमध्ये परिस्थितीमुळे चेंडू थोडा स्विंग होतो. त्याला फक्त बुमराहप्रमाणे सुसंगत लाईन आणि लेंथ टाकावी लागेल. त्याला फक्त ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे गणेश म्हणाला.





