IND vs ENG : जेमी स्मिथचे ऐतिहासिक शतक! इंग्लंडसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Jamie Smith’s Record Breaking Century : बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना विशाल धावसंख्या उभारून सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. भारतीय गोलंदाजांनीही आपली कामगिरी चोख बजावली. परंतु, इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेमी स्मिथने आपल्या आक्रमक आणि शानदार खेळीने भारताच्या सर्व योजना उद्ध्वस्त केल्या. या खेळीदरम्यान त्याने काही विक्रमही प्रस्थापित केले, जे प्रत्येक क्रिकेटप्रेमीने जाणून घ्यायलाच हवेत.
एकाच सत्रात जेमी स्मिथने पूर्ण केले शतक –
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी जेमी स्मिथ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि लंच ब्रेकपूर्वीच त्याने आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून फलंदाजी करणारा हॅरी ब्रूकला मागे टाकत स्मिथने ही कामगिरी केली. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर जो रूट आणि बेन स्टोक्स सलग दोन चेंडूंवर बाद झाले, तेव्हा इंग्लंडचा संघ दबावाखाली होता.
JAMIE SMITH — 100(80) 🔥
Walked in at 84/5. Walked out with a Bazball century.
Third-fastest Test 💯 by an Englishman.
This lad is DIFFERENT. 🧨👑 #ENGvIND #JamieSmith #Gill #INDVsENGLive
pic.twitter.com/pDGPJpKise— Nivas Manepalli (@SrinivasManep10) July 4, 2025
मात्र, जेमी स्मिथने या दबावाचा कोणताही परिणाम आपल्या खेळावर होऊ दिला नाही. तो आपल्या बेधडक शैलीत फलंदाजी करत राहिला. अशा प्रकारे, इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने पहिल्या सत्रातच लंच ब्रेकपूर्वी शतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : धक्कादायक! शुबमन गिलच्या डोक्याला लागला वेगवान चेंडू, VIDEO होतोय व्हायरल
इंग्लंडसाठी सर्वात जलद कसोटी शतक ठोकणारा तिसरा फलंदाज –
जेमी स्मिथने अवघ्या ८० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हॅरी ब्रूकसह तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. हॅरी ब्रूकने २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ८० चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. यासह स्मिथने आपला कर्णधार बेन स्टोक्सलाही मागे टाकले, ज्याने २०१५ मध्ये ८५ चेंडूंमध्ये कसोटी शतक झळकावले होते. भारताविरुद्ध कसोटी शतकांच्या बाबतीत स्मिथ आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : बर्मिंगहॅम कसोटीत फॉलोऑन टाळण्यासाठी इंग्लंडला किती धावांची गरज? काय आहे ICC चा नियम?
भारताविरुद्ध सर्वात जलद कसोटी शतके ठोकणारे फलंदाज –
भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे, ज्याने २०१२ मध्ये अवघ्या ६९ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आहे, ज्याने २०१० मध्ये ७५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे, ज्याने २००६ मध्ये ७८ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. आता जेमी स्मिथने ८० चेंडूंमध्ये शतक ठोकत या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.





