IND vs ENG : बर्मिंगहॅम कसोटीत फॉलोऑन टाळण्यासाठी इंग्लंडला किती धावांची गरज? काय आहे ICC चा नियम?

IND vs ENG England Follow On Score : बर्मिंगहम येथील एजबॅस्टन मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० ने आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघावर दुसऱ्या कसोटी सामन्यात फॉलो-ऑनचा धोका आहे. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ५८७ धावांचा विशाल डोंगर उभारला होता. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंड संघ फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांनी ३ विकेट्स गमावल्या होत्या.
त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीस आणखी दोन विकेट्स गमावल्या. त्यामुळे इंग्लंडवर डावाने सामना हरन्याचाही धोका आहे. आता प्रश्न असा आहे की, भारताने ५८७ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंड संघाने फॉलो-ऑन टाळण्यासाठी किती धावा कराव्या लागतील? या संदर्भात आयसीसीचा काय नियम आहे? जाणून घेऊया.
फॉलो-ऑनसाठी आयसीसीचा काय आहे नियम?
आयसीसीच्या नियमानुसार, पाच दिवसीय कसोटी सामन्यात स्टँडर्ड फॉलो-ऑन नियम असा आहे की, जर पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या संघाची धावसंख्या २०० किंवा त्याहून अधिक धावांनी कमी असेल, तर प्रथम फलंदाजी करणारा संघ फॉलो-ऑन देऊ शकतो आणि दुसऱ्या संघाला सलग दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करू शकतो.
हेही वाचा – IND vs ENG : मियां भाईच्या मॅजिकची कमाल! सलग दोन चेंडूंवर रुट-स्टोक्सला दाखवला तंबूचा रस्ता, पाहा VIDEO
भारत कधी देऊ शकतो फॉलो-ऑन –
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहॅम कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या आहेत. इंग्लंडला फॉलो-ऑन टाळायचा असेल आणि भारताला पुन्हा फलंदाजी करण्यास भाग पाडायचे असेल, तर त्यांना किमान ३८८ धावा कराव्या लागतील. जर इंग्लंडचा संघ ३८७ किंवा त्यापेक्षा कमी धावा करून सर्वबाद झाला, तर भारतीय संघाला फॉलो-ऑन लागू करण्याचा अधिकार असेल.
हेही वाचा – IND vs ENG : मियां भाईच्या मॅजिकची कमाल! सलग दोन चेंडूंवर रुट-स्टोक्सला दाखवला तंबूचा रस्ता, पाहा VIDEO
उदाहरणार्थ, जर इंग्लंड ३०० धावांवर सर्वबाद झाला, तरी भारतीय संघाला फॉलो-ऑन देणे बंधनकारक नाही. फॉलो-ऑन द्यायचा की नाही, हा निर्णय पूर्णपणे भारतीय संघाच्या इच्छेवर अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर, बातमी लिहेपर्यंत तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने ५ बाद २४९ धावा केल्या आहेत.





