Cheteshwar Pujara : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतरही स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी पुनरागमनाचा मार्ग कठीण झाला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या दोन्ही डावात पुजाराच्या बॅटने साथ दिली नाही. पुजाराने पहिल्या डावात केवळ तीन धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराला खातेही उघडता आले नाही. याआधी पुजारा सातत्याने चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा दावा करत होता. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या सलग अपयशानंतर चेतेश्वर पुजाराच्या पुनरागमनाची चर्चा आहे. पुजाराने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात 6 डावात 535 धावा करून निवडकर्त्यांना विचार करायला भाग पाडले होते. मात्र सौराष्ट्रकडून 300 वा सामना खेळताना महाराष्ट्राविरुद्ध पुजाराला दोन्ही डावात केवळ 3 धावा करता आल्या. या खराब कामगिरीचा पुजाराच्या सरासरीवरही परिणाम झाला आहे. पुजाराने या मोसमात आतापर्यंत 107 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पण महाराष्ट्राविरुद्धच्या अपयशानंतर पुजाराची सरासरी 76.58 इतकी घसरली आहे. गिलच्या शतकामुळे अखेरची संधीही धोक्यात… भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात शुभमन गिल फ्लॉप ठरला असता, तर पुजारासाठी पुनरागमनाचा मार्ग खुला होऊ शकत होता. मात्र, दुसऱ्या डावात शुभमन गिलने जबरदस्त पुनरागमन करत टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. गिलने 11 महिन्यांनंतर कसोटीत शतक झळकावले आहे. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. भारतीय क्रिकेटचा ‘प्रिन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमनने इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात 104 धावा केल्या. त्याने 147 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार मारले. शुभमनने यापूर्वी मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक शतक झळकावले होते. यादरम्यान त्याने 235 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 128 धावांची खेळी खेळली होती. यानंतर खेळलेल्या 12 डावांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने 12 डावात 13, 18, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 23, शून्य, 34 धावा केल्या. हैदराबाद कसोटीत तर तो शून्यावर बाद झाला, त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते आणि त्याच्या जागी पूजाराला संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, आता भारतीय निवड समिती काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुकतेचे राहणार आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून त्यात पहिल्या दोन कसोटीनंतर उर्वरीत तीन कसोटींसाठी संघ निवड होणार आहे. त्यात आपली वर्णि लागेल अशी पुजाराची अपेक्षा होती मात्र, त्याचा फ्लॉप शो कायम असल्याने आणि गिलने जोरदार पुनरागमन केल्याने त्याचे भारताच्या कसोटी संघातील पुनरागमन आता अशक्य दिसत आहे. दरम्यान,बीसीआयने गेल्या काही दिवसात युवा खेळाडूंना वारंवार संधी देत आगामी काळातील आपला हेतू स्पष्ट केला आहे. त्यामुळेच यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, शुभमन गिल, आवेश खान, सिराज यासारख्या युवा खेळाडूंना इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या दोन कसोटीत संधी दिली आहे. Ranji Trophy #MAHvSAU : घरच्या मैदानावर महाराष्ट्राचा पराभव, सौराष्ट्रचा ४८ धावांनी निर्णायक विजय… शास्त्रीने व्यक्त केले होते मत… चेतेश्वर पुजारा गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपासून संघाबाहेर आहे. भारतासाठी 100 हून अधिक कसोटी खेळलेल्या पुजाराने नुकतेच सांगितले होते की, त्याला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा टीम इंडियासाठी खेळायचे आहे. तसेच, चेतेश्वर पुजाराला टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचीही साथ लाभली आहे. जर गिल धावा करण्यात यशस्वी झाला नाही तर पुजाराला संधी द्यावी, अस मत काही दिवसापूर्वी शास्त्री यांनी व्यक्त केले होते. पुजारा धावा करत असून युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करू शकत नसतील तर पूजाराला पुन्हा संघात घ्यावे, असे शास्त्री म्हणाले होते. मात्र, दुसऱ्या डावात शुभमन गिलने जबरदस्त पुनरागमन करत टीकाकारांना कामगिरीतून उत्तर दिले, त्यामुळे पूजाराला पुन्हा संधी मिळेल ही आशा धूसर होत आहे. IND vs ENG 2nd Test Day 3 : शुभमन गिलने झळकावले तिसरे शतक; संपादन केले ‘हे’ मोठे यश… चेतेश्वर पुजाराची अशी आहे कसोटी कारकीर्द… टीम इंडियाच्या सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत खेळल्या गेलेल्या 103 सामन्यांच्या 176 डावांमध्ये 43.60 च्या सरासरीने 7,195 धावा केल्या आहेत आणि या काळात त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतके लगावली आहेत.