MPSC Protest: पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश
MPSC Protest:

आंबेडकर पुतळा परिसरात सत्याग्रह आंदोलनास सकारात्मक विचार
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली आहे. आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम आणि कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा प्रशांत अमृतकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १६३ अन्वये नोटीस बजावली आहे, तसेच आंदोलकांनी परिसर तातडीने रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रमोद दत्तात्रय पाटील आणि नितीन माणिक गिते यांना ही नोटीस देण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून, पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याचे पत्र विद्यार्थी प्रतिनिधींनी दिले होते.
त्यामुळे २ ऑक्टोबरच्या आंदोलनाची पूर्वपरवानगी रद्द झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतरही १ ऑक्टोबर रोजी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता एस. एम. जोशी पूल आणि पत्रकार भवन परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनादरम्यान चिथावणीखोर वक्तव्ये करून विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आंदोलकांनी पत्रकारावर हल्ला केल्याचे नमूद करत, याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये सार्वजनिक रस्ते व पुलांवर आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, तसेच आंदोलनासाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. सार्वजनिक जीवन विस्कळीत होणार नाही आणि रस्ते, पूल व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचा मुक्त प्रवाह कायम राहील, यासाठी राज्याने आवश्यक पावले उचलावीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पर्यायी ठिकाणासाठी सकारात्मक विचार
एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनास परवानगी नाकारताना पोलिसांनी आंदोलकांना जागेचा पर्याय सुचविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे विहित वेळेसाठी आंदोलन करण्याबाबत लेखी परवानगी मागितल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





