IND vs NZ Final : फायनलसाठी अंपायर्स-रेफरीची घोषणा! २०२४ च्या विजयाचे साक्षीदार पुन्हा अहमदाबादमध्ये; पाहा कोणाकडे आहे कमान?
IND vs NZ Final : या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच रेफरी यांची घोषणा केली आहे.

ICC Announces umpires for IND vs NZ final match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाच्या लढतीसाठी क्रिकेट विश्व सज्ज झाले आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्स आणि मॅच रेफरी यांची घोषणा केली आहे. इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स व्हार्फ यांच्यावर ‘ऑन-फील्ड अंपायर’ म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रिचर्ड इलिंगवर्थ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये अंपायरिंग करणार आहेत.
इलिंगवर्थ आणि भारतीय संघाचे ‘लकी’ कनेक्शन –
रिचर्ड इलिंगवर्थ यांनी २०२४ च्या टी-२० विश्वचषक फायनलमध्येही अंपायरिंग केले होते, ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. याशिवाय २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक फायनल आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्येही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे.
एलेक्स व्हार्फ यांची पहिलीच फायनल –
दुसरीकडे, इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज एलेक्स व्हार्फ हे पहिल्यांदाच वरिष्ठ पुरुष विश्वचषक फायनलमध्ये अंपायरिंग करणार आहेत. या दोघांनीही कोलकाता येथे पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका उपांत्य सामन्यात पंच म्हणून काम पाहिले होते.
इतर अधिकारी कोण?
- थर्ड अंपायर: अल्लाहुद्दीन पालेकर (दक्षिण आफ्रिका)
- फोर्थ अंपायर: एड्रियन होल्डस्टॉक (इंग्लंड)
- मॅच रेफरी: एंडी पायक्रॉफ्ट
फायनलमधील चुरस –
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावून नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, मिचेल सँटनरचा न्यूझीलंड संघ पहिल्या जेतेपदाच्या शोधात आहे. विशेषतः फिन्न अॅलनने सेमीफायनलमध्ये ३३ चेंडूत ठोकलेल्या शतकामुळे किवी संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.





