IND vs ENG : ‘त्याला’ चौथ्या कसोटीत खेळवा, अन्यथा मालिका गमवाल: अनिल कुंबळेंचा टीम मॅनेजमेटला इशारा!

IND vs ENG Anil Kumble Urges Bumrah to Play 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आता अतिशय रोमांचक वळणावर आली आहे. इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ असा असेल. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबले यांनी संघ व्यवस्थापनाला एक विनंती केली आहे, तसेच त्यांना इशाराही दिला आहे.
अनिल कुंबळेंचा टीम मॅनेजमेंटला इशारा –
भारतीय संघ व्यवस्थापनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की जसप्रीत बुमराह या मालिकेत फक्त तीन सामने खेळणार आहे. आतापर्यंत त्याने दोन सामने खेळले आहेत, त्यामुळे पुढील दोन सामन्यांपैकी फक्त एकाच सामन्यात तो खेळेल. परंतु मालिकेत 1-2 अशा मागे पडलेल्या भारतीय संघाला पाहता, अनिल कुंबले यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना विनंती केली आहे की त्यांनी बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यासाठी खेळण्यास तयार करावे. अन्यथा, भारतीय संघ मालिका गमावू शकतो. विशेष म्हणजे, भारताला पुढील दोन सामने मँचेस्टर आणि केनिंग्टन ओव्हल येथे खेळायचे आहेत.
अनिल कुंबले नक्की काय म्हणाले?
जियो हॉटस्टारवर बोलताना अनिल कुंबले म्हणाले, “मी मॅनेजमेंट टीमचा भाग असतो, तर मी जसप्रीत बुमराहला पुढील सामना खेळण्यास नक्की सांगितलं असतं, कारण तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. जर तो खेळला नाही आणि आपण कसोटी हरलो, तर मालिका संपुष्टात येईल. त्यामुळे मला वाटतं, बुमराहने उरलेले दोन्ही कसोटी सामने खेळायला हवेत. मला माहीत आहे की त्याने फक्त तीन कसोटी सामने खेळण्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर आपल्याला मोठा ब्रेक मिळणार आहे. काही काळ घरगुती मालिका खेळण्याची गरज नाही. त्यामुळे इच्छा असेल तर तो नंतर ब्रेक घेऊ शकतो.”
शुबमन गिलने बुमराहबद्दल काय अपडेट दिली?
जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी त्याला या मालिकेत फक्त तीन सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉर्ड्स कसोटीनंतर शुबमन गिलला बुमराहबद्दल प्रश्न विचारला गेला. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये कर्णधार शुबमन गिलला बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर गिल म्हणाला, “तुम्हाला लवकरच कळेल.” म्हणजेच बुमराह पुढील सामन्यात खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट नाही, पण लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.





