IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑली पोप-टॉम हार्टलीने पलटवला सामना…

India vs England 1st Test Full Highlights : हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यजमान भारताला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळलेला हा सामना चार दिवसात संपला. मात्र, हा पराभव भारतीय संघासाठी अत्यंत लाजिरवाणा आहे. या सामन्याच्या चौथ्या डावात भारत अवघ्या दोन सत्रात सर्वबाद झाला.
या सामन्यात चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता, मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडने आश्चर्यकारक कामगिरी करत सामना जिंकला. 190 धावांनी पिछाडीवर असताना शानदार पुनरागमन करत इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार होते दुसऱ्या डावात 196 धावा करणारा ऑली पोप आणि दुसऱ्या डावात सात बळी घेणारा टॉम हार्टली. हार्टली यांची ही पदार्पण कसोटी होती.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या आणि 190 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 202 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
It came right down to the wire in Hyderabad but it’s England who win the closely-fought contest.#TeamIndia will aim to bounce back in the next game.
Scorecard ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/OcmEgKCjUT
— BCCI (@BCCI) January 28, 2024
काय घडलं मॅचमध्ये?
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बेन स्टोक्सच्या 70 धावांमुळे संघाला 246 धावा करण्यात यश आले. भारताकडून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 80 धावांचे, लोकेश राहुलने 86 धावांचे आणि रवींद्र जडेजाने 87 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जो रूटने चार तर हार्टले आणि रेहानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ऑली पोपने 196 आणि बेन डकेटने 47 धावा केल्या. भारताच्या बुमराहने चार आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 420 धावा करण्यात यशस्वी ठरला आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 39 धावा केल्या. अश्विन आणि भरत यांनी प्रत्येकी 28 धावा केल्या. याव्यतिरिक्त केएल राहुल (22), यशस्वी जैस्वाल (15), अक्षर पटेल(17), श्रेयस अय्यर (13),रवींद्र जडेजा (02), शुभमन गिल(00) हे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडच्या टॉम हार्टलीने सात विकेट घेत संघाच्या विजयात सर्वात महत्त्वाचे योगदान दिले. टॉम हार्टलीने पदार्पण कसोटी खेळताना एकूण 7 भारतीय फलंदाजांना आपले बळी बनवले. यादरम्यान त्याने 26.2 षटकात 62 धावा दिल्या. याशिवाय जो रूट आणि जॅक लीच यांना 1-1 असे यश मिळाले.
A special spell from Tom Hartley leads England to an extraordinary win in the opening Test against India 👏#WTC25 | 📝 #INDvENG: https://t.co/E53vcqjfHE pic.twitter.com/qoJl3biFfu
— ICC (@ICC) January 28, 2024
सामन्यातील काही रेकाॅर्डस….
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही केवळ चौथी वेळ आहे, जेव्हा इंग्लंड संघाने सामन्यात सर्व 20 विकेट घेतल्या आहेत, परंतु त्यांच्या वेगवान गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. यापूर्वी 1952 मध्ये नागपुरात भारताविरुद्ध, 1956 मध्ये मँचेस्टरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 2018 मध्ये पल्लेकेलेमध्ये श्रीलंकेविरुद्ध असे घडले होते.
भारताचा हा चौथा सर्वात लहान पराभव आहे. यापूर्वी भारताला 1999 मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध 12 धावांनी, 1977 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 धावांनी आणि बंगळुरूमध्ये 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
एका डावात 410 हून अधिक धावा केल्यानंतर भारताने घरच्या मैदानावर कसोटी सामना गमावण्याची ही चौथी वेळ होती. यापूर्वी 2005 मध्ये बेंगळुरूमध्ये भारताने 449 धावा करूनही पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करला होता. त्याच वेळी, 1998 मध्ये बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 424 धावा आणि 1985 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध 412 धावा करूनही टीम इंडियाचा पराभव झाला. आता इंग्लंडविरूध्द (2024) पहिल्या डावात 436 धावा करूनही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
भारताने 150 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेऊनही कसोटी सामना गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2015 मध्ये गाले येथे श्रीलंकेविरुद्ध असे घडले होते. त्यानंतर 192 धावांची आघाडी घेऊनही भारतीय संघाचा पराभव झाला.



