England Lions vs India A 2nd ‘Unofficial Test’ : भारत अ संघाने चमकदार कामगिरी करत दुसऱ्या अनधिकृत कसोटीत इंग्लंड लायन्सचा एक डाव आणि 16 धावांनी पराभव केला. मालिकेतील पहिली अनधिकृत कसोटी अनिर्णित राहिली होती. अशाप्रकारे भारत अ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादमध्ये 1 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.
दुसऱ्या सामन्यात शनिवारी, चौथ्या आणि अखेरच्या दिवशी, लायन्सने 8 बाद 304 धावसंख्येवरून पुढे दुसरा डाव सुरू केला आणि अवघ्या 5.2 षटकांत शेवटच्या दोन विकेट 17 धावांवर गमावल्या आणि अशाप्रकारे भारतीय संघाने दुसऱ्या डावात इंग्लंड लायन्सला 321 धावांत गुंडाळले. अर्शदीप सिंग आणि यश दयाल यांनी अनुक्रमे ऑली रॉबिन्सन (85) आणि टॉम लॉस (32) यांची विकेट घेत भारत ‘अ’ संघाला विजय मिळवून दिला.
भारताने सर्फराज आणि देवदत्त पडिक्कल (105) यांच्या शतकांच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात 152 धावा केल्या होत्या. यासह भारताने पहिल्या डावात 337 धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंड लायन्सचा दुसरा डावा 321 धावसंख्येवर आटोपला. सर्फराज खान सामनावीर ठरला. त्याने पहिल्या डावात 161 धावांची शतकी खेळी खेळली.
डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारने प्रभावी गोलंदाजी केली. डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारने दुसऱ्या डावात पाच विकेट घेत भारत ‘अ’ संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग आणि आकाश दीपने प्रत्येकी 2 बळी घेतले. आकाशदीपने सामन्यात एकूण सहा बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
संक्षिप्त धावसंख्या :
इंग्लंड लायन्स : पहिला डाव 152 आणि दुसरा डाव 90.2 षटकांत सर्वबाद 321 धावा (ऑली रॉबिन्सन 85, टॉम लॉस 32; सौरभ कुमार 5/104, आकाश दीप 2/57) भारत अ : 111.1 षटकात 489 धावा (सर्फराज खान 161 आणि देवदत्त पडिक्कल 105; मॅथ्यू पॉट्स 6/125, ब्रायडन कार्स 3/81)