IND vs BAN 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळणार आहे. टीम इंडियाने पहिले 2 सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. याशिवाय ज्या खेळाडूंची कामगिरी मागील दोन सामन्यांमध्ये चांगली झाली नाही, त्यांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवले जाणार आहे. तिसऱ्या सामन्यातही या खेळाडूंना कामगिरी करता आली नाही, तर त्यांचा पुढचा मार्ग खडतर होऊ शकतो.
‘या’ 2 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार लक्ष….
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. या दोन्ही खेळाडूंनी गेल्या दोन सामन्यात संघासाठी डावाची सुरुवात केली होती पण दोन्ही सामन्यात ते फ्लॉप ठरले. त्यामुळे तिसरा सामना या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. आणखी एक खराब कामगिरी त्यांना संघातून वगळू शकते.
IND vs BAN 2nd T20 : टीम इंडियाचा बांगलादेशवर 86 धावांनी विजय, मालिकेतही घेतली अजेय आघाडी…
मागील 2 सामन्यातील कामगिरी…
सॅमसन आणि अभिषेक या दोघांना पहिल्या 2 टी-20 मध्ये सलामीची संधी मिळाली. या दोघांनाही मोठी खेळी खेळण्याची पूर्ण संधी होती. मात्र हे दोन्ही फलंदाज गेल्या दोन डावात फ्लॉप ठरले आहेत. पहिल्या टी-20 मध्ये 29 आणि दुसऱ्या सामन्यात 10 धावा करून सॅमसन बाद झाला. तर अभिषेक शर्मा पहिल्या टी-20 मध्ये 16 धावा आणि दुसऱ्या टी-20 मध्ये 15 धावा करून बाद झाला. तिसऱ्या सामन्यात या दोघांकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
अशी राहिली कारकीर्द…
अभिषेक शर्माने 7 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान एका शतकाच्या मदतीने त्यानं 155 धावा केल्या आहेत आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर संजू सॅमसनने 32 टी-20 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 483 धावा केल्या आहेत.