IND vs BAN 2nd T20 : टीम इंडियाचा बांगलादेशवर 86 धावांनी विजय, मालिकेतही घेतली अजेय आघाडी…

IND vs BAN 2nd T20 Match Result : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा 83 धावांनी पराभव केला.
नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 135 धावा करू शकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याआधी भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला होता.
Delight in Delhi! 🥳#TeamIndia register a 86-run win in the 2nd T20I and seal the series 2⃣-0⃣
Scorecard – https://t.co/Otw9CpO67y#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KfPHxoSZE4
— BCCI (@BCCI) October 9, 2024
बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या, तो 39 चेंडूंत तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला. या व्यतिरिक्त एकाही फलंदाजांला भारतीय गोलंदाजांसमोर 20 धावांपार मजल मारता आली नाही. भारताकडून नितीश रेड्डीने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करत दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी गेल्या सामन्यात छाप पाडणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनेही दोन बळी घेतले. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक गोलंदाजाला एक विकेट मिळाली. नितीश आणि वरुणशिवाय अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रायन पराग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान, त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. खराब सुरुवात करूनही टीम इंडियाने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशला 222 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी शानदार अर्धशतके झळकावली, ज्याच्या बळावर संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 221 धावा केल्या.
India are a class apart and they seal the series with two huge wins 🔥
🔗 https://t.co/CBhsGt8i18 | #INDvBAN pic.twitter.com/VgpoHWZM8w
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 9, 2024
एकवेळ भारताने अवघ्या 41 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसन (10), अभिषेक शर्मा (15) आणि सूर्यकुमार यादव (08) या तीन फलंदाजांनी निराशा केली. सुरुवातीच्या धक्क्यानंतर नितीश आणि रिंकूने आक्रमक फलंदाजी केली आणि चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान नितीशने आपला दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळताना कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतरही नितीशने आपली आक्रमक फलंदाजी थांबवली नाही आणि फटकेबाजी सुरूच ठेवली.
नितीश 34 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 74 धावा करून बाद झाला. नितीश बाद झाल्यानंतर रिंकू सिंगनेही अर्धशतक झळकावले, मात्र तो 29 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 53 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनी फटकेबाजी केली. हार्दिकने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या तर परागने 6 चेंडूत 15 धावा केल्या आणि भारताची धावसंख्या 200 धावा पार नेली. पण त्यानंतर भारतीय संघाने शेवटच्या षटकात तीन विकेट गमावल्या आणि 20 षटकात 9 विकेट गमावत 221 धावा केल्या.
बांगलादेशकडून तस्किन अहमदने चार षटकांत केवळ 16 धावा देत दोन बळी घेताना चांगली गोलंदाजी केली. इतर सर्व गोलंदाजांची मात्र चांगलीच धुलाई झाली. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने तीन बळी घेतले मात्र 4 षटकात 55 धावा दिल्या. तनझिम हसन साकिब (4 षटकात 50 धावा) आणि मुस्तफिजुर रहमान (4 षटकात 36 धावा) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.





