IND vs BAN : भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवत १२व्यांदा फायनलमध्ये मारली एन्ट्री! अभिषेक-कुलदीप ठरले विजयाचे हिरो

IND vs BAN India enters Asia Cup 2025 Final : आशिया कप २०२५ च्या सुपर फोर फेरीत भारताने बांगलादेशला ४१ धावांनी पराभूत करत १२व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताने बांगलादेशविरुद्धही दमदार कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने ६ विकेट्स गमावून १६९ धावांचे दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १२७ धावांत गारद झाला. या सामन्यात अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीतील उत्कृष्ट प्रदर्शनाने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
अभिषेक शर्माने दाखवला जलवा –
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये ७५ धावांची खणखणीत खेळी साकारली, ज्यात ५ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. अवघ्या २५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेकने अडखळलेल्या भारतीय डावाला सावरले. मात्र, इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. शुबमन गिलने चांगली सुरुवात करूनही २९ धावाच केल्या, तर शिवम दुबे (२), सूर्यकुमार यादव (५), तिलक वर्मा (५) आणि अक्षर पटेल (१०) यांना मोठी खेळी करता आली नाही.
𝗜𝗻𝘁𝗼 𝗧𝗵𝗲 𝗙𝗶𝗻𝗮𝗹! 👍
The winning run continues for #TeamIndia & we seal a place in the summit clash of the #AsiaCup2025, with a game to spare in #Super4! 🙌 pic.twitter.com/AV40ifvIiv
— BCCI (@BCCI) September 24, 2025
भारतीय गोलंदाजांनी विजयात उचलला मोलाचा वाटा –
भारताची फलंदाजी भक्कम मानली जाते, परंतु या सामन्यात गोलंदाजांनी विजयाची खरी स्क्रिप्ट लिहिली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात यश मिळवत बांगलादेशला धक्का दिला, तर मधल्या षटकांत वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी सामन्यावर पूर्णपणे ताबा मिळवला. कुलदीपने ४ षटकांत केवळ १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या, तर वरुणने २ विकेट्स घेतले. या दोघांनी मिळून ८ षटकांत ४७ धावा देत बांगलादेशचे ५ गडी बाद केले, ज्यामुळे बांगलादेशचा डाव १२७ धावांत गडगडला आणि भारताने ४१ धावांनी विजय मिळवला.
आशिया कपमधील भारताचे वर्चस्व कायम –
आशिया कपमध्ये भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. भारताने तब्बल १२ व्या वेळी अंतिम फेरी गाठली असून, यापूर्वी ८ वेळा (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३) हा किताब जिंकला आहे. आता २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत नवव्या विजेतेपदासाठी उत्सुक आहे. तत्पूर्वी भारत २६ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध सुपर फोरचा शेवटचा सामना खेळेल, परंतु हा सामना केवळ औपचारिकता आहे, कारण भारतीय संघाने २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आधीच पात्रता मिळवली आहे.





