IND vs BAN : ‘टीम इंडियात पुनरागमनाची आशा नाही…’, संघ निवडीवर युवा फलंदाजाचे धक्कादायक विधान…

IND vs BAN : भारतीय क्रिकेट संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. बदल प्रत्येक फॉरमॅटमध्ये दिसत आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर टीम इंडियाचा पुढचा दौरा बांगलादेशसोबत आहे. बांगलादेश 2 कसोटी आणि 3 टी-20 सामन्यांच्या दौऱ्यासाठी भारतात येणार आहे. 19 सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होत आहे. कसोटी फॉर्मेटमधून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वगळण्यात आले आहे. हे दोन्ही खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात परततील, अशी कोणतीही आशा जवळ-जवळ दिसत नाही. या दोन फलंदाजांशिवाय एक युवा खेळाडूलाही टीम इंडियात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा नाही.
भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात करणारा सरफराज खान याला बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा नाही. सर्फराज म्हणाला की, मला भारतात संघात पुनरागमनाची फारशी आशा नाही. पण, मला संधी मिळाली तर मी नेहमीप्रमाणे तयार असेन.
सर्फराज पुढे म्हणाला की, काही खेळाडूंना लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळते. माझ्या बाबतीत असे घडले नाही पण मी माझा वेळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवला आणि त्याचा फायदा मला पदार्पणाच्या मालिकेत मिळाला. सर्फराज खान सध्या बुची बाबू टूर्नामेंटमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. या वर्षी, त्याने इंग्लंडविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीची चांगली सुरुवात केली होती आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 5 डावात 200 धावा केल्या होत्या.
असे विधान का दिले…?
सर्फराज खानने कसोटी संघात पुनरागमन न होण्याबाबत वक्तव्य केले आहे कारण अनेक वरिष्ठ खेळाडूंचे यंदा संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. विराट कोहलीही उपस्थित राहणार आहे. हे सर्व खेळाडू त्यावेळी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नव्हते. याच कारणामुळे सरफराजला संधी मिळाली होती. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हे चौघे संघात परतले तर अशा परिस्थितीत सर्फराजला संघात स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे.





