Rahul Dravid Son Debut in Maharaja Trophy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या मुलाने पदार्पण केले आहे. समित द्रविडने (Samit Dravid) महाराजा ट्रॉफी टी-20 स्पर्धेत पहिला सामना खेळून व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली. मात्र, पहिल्या सामन्यात राहुलचा मुलगा समित काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 7 धावा करून बाद झाला.
राहुल द्रविडच्या मुलाची कामगिरी…
महाराजा ट्रॉफीला 15 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. जिथे, बेंगळुरू ब्लास्टर्स आणि म्हैसूर वॉरियर्स यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने पदार्पण केले. समितला लिलावात 50 हजार रुपयांना विकत घेण्यात आले आहे आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्याचा उत्तम मार्ग आहे. करुण नायरच्या नेतृत्वाखाली म्हैसूर वॉरियर्स संघाकडून खेळताना समित द्रविड केवळ 7 धावा करून बाद झाला. मात्र, हा त्याचा पहिलाच सामना असून समितला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
राहुल द्रविडला ‘द वॉल’ म्हणून ओळखले जात असे, कारण तो एकदा मैदानात स्थिरावला की त्याला बाद करणे विरोधी गोलंदाजांसाठी खूप कठीण होऊन जायचे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे. आता द्रविडचा मुलगा समितची वेळ आली आहे आणि तोही लवकरच भारतासाठी पदार्पण करेल आणि भारतीय संघाला एक नवा स्टार मिळेल अशी आशा आहे.
करुण नायरच्या संघाने जिंकला सामना…
महाराजा ट्रॉफीच्या या सामन्यात बेंगळुरू ब्लास्टर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना म्हैसूर वॉरियर्सने 20 षटकात 8 बाद 159 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. निम्मा संघ 70 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता, पण अखेरीस मनोज भंडगे आणि किशन बिदारे यांच्यात 9व्या विकेटसाठी झालेल्या 55 धावांच्या नाबाद भागीदारीने संघाला 159 धावांपर्यंत मजल मारता आली.
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीमध्ये रोहित-कोहली का खेळणार नाहीत? जय शहांनी सांगितले खरे कारण…
सामन्यावर पावसाचा परिणाम झाला, त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाचा वापर करण्यात आला, त्यानंतर बेंगळुरू ब्लास्टर्सला 9 षटकांत 88 धावांचे लक्ष्य मिळाले. पण प्रत्युत्तरात संघाला 5 विकेट गमावून 80 धावाच करता आल्या, त्यामुळे समित द्रविडचा संघ म्हैसूर वॉरियर्सने 7 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतील पहिला सामना जिंकून म्हैसूर वॉरियर्स आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहे.