Sarfaraz Khan Double Century : सर्फराझ खानचा कहर! रणजी ट्रॉफीत ठोकलं धडाकेबाज द्विशतक
Sarfaraz Khan Double Century : सर्फराझ खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने हैदराबादविरुद्ध पहिल्या डावात ५६० धावांचा डोंगर उभा केला आहे.

Sarfaraz Khan Double Century : भारतीय क्रिकेटचा ‘धावांचे मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्फराझ खान ने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर, सर्फराझ चा फॉर्म रणजी ट्रॉफी(Ranji Trophy)मध्येही कायम आहे. हैदराबादविरुद्ध खेळताना सर्फराझने अवघ्या २०६ चेंडूंमध्ये शानदार द्विशतक झळकावून भारतीय संघात पुनरागमनाचे दावेदारी भक्कम केली आहे.
२२७ धावांची साकारली तुफानी खेळी –
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सर्फराझ खान ने किलर फलंदाजी केली. त्याने २१९ चेंडूंचा सामना करताना २२७ धावा कुटल्या. या खेळीत त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार लगावले. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील १७ वे शतक आणि सहावे द्विशतक ठरले. जरी त्याचे तिहेरी शतक हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अजब विक्रम: ५० दिवसांत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं!
सर्फराझ खानने झळकावले दुहेरी शतक
सर्फराझ खानने (Sarfaraz Khan) गेल्या ५० दिवसांत देशांतर्गत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतके ठोकण्याचा दुर्मिळ पराक्रम केला आहे:
- २ डिसेंबर: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (T20) – आसामविरुद्ध ४७ चेंडूत १०० धावा.
- ३१ डिसेंबर: विजय हजारे ट्रॉफी (ODI) – गोव्याविरुद्ध ७५ चेंडूत १५७ धावा.
- जानेवारी: रणजी ट्रॉफी (Test format) – हैदराबादविरुद्ध २२७ धावा.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा पूर्ण –
या खेळीदरम्यान सर्फराझने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५,००० धावांचा टप्पाही ओलांडला आहे. आतापर्यंत ६१ सामन्यांच्या ९१ डावांमध्ये त्याने ६४.३ च्या जबरदस्त सरासरीने ५,०९० धावा केल्या आहेत. ७०.१० चा स्ट्राइक रेट त्याच्या आक्रमक खेळाची साक्ष देतो.
टीम इंडियात पुनरागमनाची प्रतीक्षा –
२०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या सर्फराझने ६ कसोटी सामन्यांत ३७१ धावा केल्या आहेत. मागील एक वर्षापासून तो भारतीय संघाबाहेर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तो संघाचा भाग होता, पण त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली नव्हती. आता या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर आगामी कसोटी मालिकेत त्याला संधी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





