Abhishek Sharma Break Shikhar Dhawan record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना होबार्टच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सनी धुव्वा उडवत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. मात्र, भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा केवळ २५ धावांची खेळी करून बाद झाला, तरीही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना टिम डेव्हिड आणि मार्कस स्टोइनिस यांच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य वॉशिंग्टन सुंदरच्या वादळी ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर १८.३ षटकांत ५ गडी गमावून सहज पार केले. अभिषेक शर्माने मोडला शिखर धवनचा विक्रम – भारतीय डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा २०२५ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. तिसऱ्या सामन्यात मात्र तो फॉर्म कायम ठेवू शकला नाही आणि २५ धावांवर बाद झाला. तरीही या खेळीच्या जोरावर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा सलामी फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने शिखर धवनचा २०१८ चा विक्रम मोडला. अभिषेकने आतापर्यंत २०२५ मध्ये ७०५ धावा केल्या आहेत, तर शिखर धवनने २०१८ मध्ये ६८९ धावा केल्या होत्या. हेही वाचा – IND vs AUS : वॉशिंग्टन-अर्शदीपच्या जोरावर भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय! मालिकेत १-१ ने साधली बरोबरी एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय सलामी फलंदाज: अभिषेक शर्मा – ७०५ धावा (२०२५) शिखर धवन – ६८९ धावा (२०१८) रोहित शर्मा – ६४९ धावा (२०२२) रोहित शर्मा – ५९० धावा (२०१८) रोहित शर्मा – ४९७ धावा (२०१६) इशान किशन – ४७६ धावा (२०२२) हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांची विजयी घोडदौड कायम! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती सूर्याचा विक्रम मोडण्याची अभिषेकला सुवर्णसंधी – भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उर्वरित २ टी-२० सामने आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत अभिषेक शर्माकडे एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये ३१ सामन्यात ११६४ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी अभिषेकला पुढील ७ सामन्यात ४६० धावांची आवश्यकता आहे.