IND vs AFG : भारताचा ऐतिहासिक विजय! आरोन जॉर्जच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानला नमवत १० व्यांदा गाठली फायनल
IND vs AFG : अटीतटीच्या सेमीफायनल सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ विकेट्सनी पराभव करून १० व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

IND vs AFG India beat Afghanistan U19 Semifinal : भारतीय अंडर-१९ संघाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अटीतटीच्या सेमीफायनल सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ विकेट्सनी पराभव करून १० व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ३११ धावांचे आव्हान भारताने आरोन जॉर्जच्या शतकाच्या जोरावर, अंडर-१९ वर्ल्ड कपच्या इतिहासात सेमीफायनलमध्ये ‘सर्वात मोठे लक्ष्य’ यशस्वीपणे गाठण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
अफगाणिस्तानचा धावांचा डोंगर –
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, जो अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. अफगाणिस्तानकडून फैसल शिनोझादा (११० धावा) आणि उजैरुल्लाह नियाझी (नाबाद १०१ धावा) यांनी शतके झळकावत भारतासमोर ४ बाद ३१० धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. भारताकडून दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Aaron George is the Player of the Match for his superb knock 👌
India U19 register the highest successful run-chase in ICC Men’s U19 World Cups to clinch a 7️⃣-wicket win over Afghanistan U19 in the semi-final 🔝
Scorecard ▶️ https://t.co/rM2IsqdXXr#U19WorldCup pic.twitter.com/dHww5uf3iw
— BCCI (@BCCI) February 4, 2026
वैभवची तुफानी सुरुवात अन् आयुषचा संयम –
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर वैभव सूर्यवंशीने मैदानावर आग लावली. त्याने अवघ्या ३३ चेंडूंत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावा कुटल्या. वैभवने १० षटकांतच भारताला ९० धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने जबाबदारीने खेळत ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
आरोन जॉर्जने ठोकले शतक –
या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो सलामीवीर आरोन जॉर्ज. त्याने सुरुवातीपासून एक बाजू लावून धरली आणि ९५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. जॉर्जने एकूण १०४ चेंडूंत १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. विहान मल्होत्राच्या ३८ धावांच्या साथीमुळे भारताने हे ऐतिहासिक लक्ष्य गाठले.
आता फायनलमध्ये इंग्लंडशी भिडत –
भारतीय संघ आता सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. अंतिम सामन्यात भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. १० व्यांदा फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म पाहता जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.





