IND U19 vs NZ U19 : इंडियाच्या यंग ब्रिगेडने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत साधली विजयाची हॅट्ट्रिक! अम्ब्रीशच्या फिरकीने वेधलं लक्ष
IND U19 vs NZ U19 : भारताच्या अंडर-१९ संघाने न्यूझीलंडलाही धूळ चारत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे.

IND U19 vs NZ U19 Highlights : भारतीय अंडर-१९ संघाने विश्वचषकात आपला विजयी धडाका कायम राखला आहे. शनिवारी झालेल्या २४ व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला. बांगलादेश आणि अमेरिकेनंतर आता न्यूझीलंडलाही धूळ चारत भारताने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेले आव्हान भारताने अवघ्या १३.३ षटकांत पूर्ण केले.
अम्ब्रीश-हेनिलच्या फिरकीपुढे किवी फलंदाज हतबल –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या भेदक माऱ्यापुढे किवी फलंदाजांनी नांगी टाकली. ३६.२ षटकांत न्यूझीलंडचा संघ अवघ्या १३५ धावांवर गारद झाला.
Innings Break!
On the back of 4⃣/2⃣9⃣ from Ambrish R.S, India U19 restrict New Zealand U19 to 135 🙌
Over to our batters ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/tsYh3Rm1eV #U19WorldCup pic.twitter.com/1H2Q7RDNGf
— BCCI (@BCCI) January 24, 2026
अम्ब्रीशने ४ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या वरच्या फळीला खिंडार पाडले. त्याला उत्तम साथ देताना हेनिल पटेलने ३ फलंदाजांना तंबूत धाडले. न्यूझीलंडकडून संजयने सर्वाधिक २८ आणि जॅकबने २३ धावा केल्या, मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
पावसाचा व्यत्यय आणि सुधारित लक्ष्य –
आरएस अम्ब्रीशने घेतल्या 4 विकेट्स
पावसामुळे खेळावर परिणाम झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी ३७ षटकांत १३० धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. हे छोटे आव्हान भारतीय फलंदाजांनी टी-२० च्या स्टाईलने अवघ्या १३ व्या षटकातच गाठले.
कर्णधार आयुष आणि वैभवचे रणशिंग –
विजयाचा पाठलाग करताना सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अवघ्या २३ चेंडूत ४० धावांची (२ चौकार, ३ षटकार) स्फोटक खेळी करत पाया रचला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला. आयुषने २७ चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी केली, ज्यात ६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. शेवटी विहान (१७*) आणि वेदांत (१३*) यांनी औपचारिकता पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला.





