IND U19 vs BAN U19 : टीम इंडियाची विजयी गर्जना! बांगलादेशचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय; विहान-अभिज्ञान ठरले शिल्पकार

IND U19 vs BAN U19 India beat Bangladesh : आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय युवा संघाने आपला धडाका कायम राखला आहे. स्पर्धेतील सातव्या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस (DLS) नियमाच्या आधारे बांगलादेशचा १८ धावांना पराभव केला. पावसाच्या व्यत्ययानंतरही भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे टीम इंडियाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.
वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडूची सावरली भिस्त –
क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४९ षटकांचा करण्यात आला. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. कर्णधार आयुष म्हात्रे, वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा स्वस्तात बाद झाल्यामुळे भारत अडचणीत सापडला होता.
Vihaan Malhotra is the Player of the Match for his fantastic spell 🙌
India U19 clinch a thriller by 18 runs (DLS Method) to make it 2⃣ wins out of 2⃣ 👌
Scorecard ▶️ https://t.co/8P6KxkszO5#U19WorldCup pic.twitter.com/uEen5eU9X3
— BCCI (@BCCI) January 17, 2026
मात्र, वैभव सूर्यवंशी (७२ धावा) आणि अभिज्ञान कुंडू (८० धावा) यांनी शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. वैभवने ६७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले, तर कुंडूने ११२ चेंडूत संयमी खेळी केली. कनिष्क चौहानच्या २८ धावांच्या जोरावर भारताने ४८.४ षटकांत २३८ धावा केल्या. बांगलादेशकडून अल फहदने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – BCB Requests ICC : टी-२० विश्वचषक भारतात खेळण्यास बांगलादेशचा पुन्हा नकार! आता ICC समोर ठेवली ‘ही’ नवी अट
विहान मल्होत्राची फिरकी आणि पावसाचा खेळ-
प्रत्युत्तरात २३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. १७.२ षटकांत त्यांनी २ बाद ९० धावा केल्या होत्या, पण पुन्हा पावसाने हजेरी लावली. डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशला २९ षटकांत १६५ धावांचे नवे लक्ष्य देण्यात आले.
येथूनच सामन्याचे चित्र पालटले. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या विहान मल्होत्राने चेंडू हातात घेताच बांगलादेशची दाणादाण उडवली. विहानने ४ विकेट्स घेत बांगलादेशचा डाव १४६ धावांत गुंडाळला. खिलन पटेलने २, तर दीपेश देवेंद्रन, हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी १ बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.





