India U19 vs Australia U19 (2nd Youth Test) : – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका बुधवारी संपली. भारताच्या अंडर-19 संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 120 धावांनी दारूण पराभव केला. (India U19 Won by an innings and 120 Run(s) against Australia U-19) या विजयासह भारतीय संघाने मालिका 2-0 अशी खिशात घातली. चेन्नईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात अनमोलजीत सिंगने नऊ आणि मोहम्मद अननने सात विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अनमोजितला त्याच्या घातक कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
बुधवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय युवा संघाने कांगारू संघाला पहिल्या डावात 277 धावांत आणि दुसऱ्या डावात 95 धावांत गुंडाळत मोठ्या विजयाची नोंद केली. पहिल्या डावात भारताच्या 492 धावांच्या प्रचंड धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघाने 3 बाद 142 धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली मात्र दिवसभरात त्यांनी 17 विकेट गमावल्या.
India U19 Won by an innings and 120 Run(s) #IndvsAus #U19Multiday Scorecard:https://t.co/MA4dL0c9Nz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 9, 2024
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 277 वर संपुष्टात…
पाहुण्या संघाने बुधवारी सकाळी कालच्या तीन बाद 142 धावांच्या पुढे खेळाला सुरुवात केली आणि 208 धावांवर त्याची चौथी विकेट ली यंग (66) च्या रूपाने पडली, जो अनमोलजीतच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या. मात्र, या काळात कर्णधार ऑलिव्हर पिकने आपले शतक पूर्ण केले. तोही अनमोलजीतच्या गोलंदाजीवर बाद झाला.
ऑलिव्हरने 16 चौकार आणि एक षटकार लगावत 117 धावा केल्या. कर्णधार ऑलिव्हर पीके (143 चेंडूत 117 धावा) आणि यष्टीरक्षक ॲलेक्स ली यंग (66 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी केली. मात्र ली यंग बाद झाल्यानंतर शेवटच्या सहा विकेट 59 धावांतच पडल्या. अखेर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 277 धावांत गारद झाला. यादरम्यान पहिल्या डावात गोलंदाजीत भारतातर्फे लुधियानाच्या अनमोलजीत आणि केरळच्या मोहम्मद अननने प्रत्येकी चार गडी बाद केले. समर्थ नागराजने एका फलंदाजाला बाद केले.
भारताकडून फॉलोऑन….
पहिल्या डावात 215 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. चार दिवसीय सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ 150 हून अधिक धावांनी पिछाडीवर असतानाच फॉलोऑन दिला जाऊ शकतो. मात्र भारताकडे 215 धावांची आघाडी होती.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 95 धावांत गारद
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. त्यांनी 24 धावांवर रिले किंगसेलची (2) विकेट गमावली. त्यानंतर केवळ सायमन बज (26) आणि स्टीव्हन होगन (29) काही काळ टिकू शकले. याशिवाय फक्त हॅरी होक्स्ट्रा (20) दुहेरी आकडा गाठू शकला. चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. अखेर कांगारूंचा संघ दुसऱ्या डावात 95 धावांत गारद झाला.
भारतासाठी दुसऱ्या डावात अनमोलजीतने पाच आणि मोहम्मद अननने तीन बळी घेतले. चेतन शर्माने एका फलंदाजाला बाद केले. अनमोलजीतने 2023 च्या मोसमात विजय मर्चंट (16 वर्षांखालील) ट्रॉफीमध्ये 65 विकेट घेतल्या होत्या.
Ranji Trophy 2024-25 : झारखंडचा संघ जाहीर…! इशान किशनचं चमकलं नशिब, मिळाली मोठी जबाबदारी…
भारताचा पहिल्या डावात धावांचा डोंगर….
भारतानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय अंडर-19 संघाने 133.3 षटकात 492 धावा केल्या होत्या. यामध्ये हरवंश पंगालिया (117) याने शतकी खेळी केली तर नित्या पांडे (94), केपी कार्तिकेय (71), निखिल कुमार (61) आणि कर्णधार सोहम पटवर्धन (63) यांनी अर्शशतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात गोलंदाजीत हॅरी होक्स्ट्रा, ऑली पॅटरसन, ख्रिश्चन हॉवे आणि लॅचलान रानाल्डो यांनी प्रत्येकी दोन तर विश्वास रामकुमार आणि रिले किंगसेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.