IND vs NZ Test Series 2024 : भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर..! विल्यमसनची निवड पण कर्णधारपद मात्र लॅथमकडे, जाणून घ्या कारण….

India vs New Zealand Test Series 2024 :- न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज व कर्णधार केन विल्यमसन, कंबरेच्या दुखापतीमुळे 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेच्या पहिल्या टप्प्यात बाहेर राहणार आहे. त्याऐवजी मार्क चॅपमनचा न्यूझीलंडच्या 17 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विल्यमसनच्या नावाची घोषणा केली असली तरी खेळण्याबाबत साशंकता कायम आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये, दुसरी कसोटी 24 ऑक्टोबरपासून पुण्यात, तर तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे. पहिल्या लढतीसाठी कर्णधारपदाची धुरा टॉम लॅथमकडे सोपविण्यात आली आहे. बंगळूर येथे पहिल्या कसोटीसाठी अष्टपैलू मिचेल ब्रेसवेलचा संघात समावेश करण्यात आला असून फिरकीपटू ईश सोढीचा समावेश दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीसाठी करण्यात आला आहे.
ICYMI | Our Test squad for the upcoming three-Test series against India, starting in Bengaluru next Wednesday. Watch all matches LIVE on @skysportnz 🏏 #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/TzvMIpZSrH
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 8, 2024
श्रीलंकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर टीम साउथीने न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद सोडले. भारत दौऱ्यावर टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज साउथीने संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. कर्णधारपदाचा राजीनामा देताना साउथीनं म्हटलं होतं की, माझ्या कारकिर्दीत मी संघाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. येत्या काळात मला माझ्या खेळावर जास्त लक्ष केंद्रित करायचे असून सातत्याने बळी घेऊन न्यूझीलंडच्या विजयात योगदान देवू इच्छितो.
पहिला कसोटी सामना 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात खेळवला जाईल. तिसरी आणि शेवटची कसोटी 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
न्यूझीलंड कसोटी संघ पुढील प्रमाणे : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मायकेल ब्रेसवेल (पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, ईश सोधी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत), टिम साउथी, केन विल्यमसन, विल यंग.





