IND U19 vs AUS U19 : भारत अंडर-19 संघाचा धमाकेदार विजय, ऑस्ट्रेलियाला धूळ चारत मालिकेत घेतली अभेद्य आघाडी

IND U19 vs AUS U19 2nd ODI : भारतीय अंडर-19 संघाने दुसऱ्या युथ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाचा 51 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकांत 300 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या जेडन ड्रेपरने शतक झळकावले असले, तरी अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांचा संघ 47.2 षटकांत 249 धावांतच गारद झाला.
वैभव आणि विहानने साकारली दमदार खेळी –
भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार आयुष म्हात्रे शून्य धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनी शानदार अर्धशतके ठोकली. दोघांनी प्रत्येकी 70 धावा केल्या. अभिज्ञान कुंडूने 64 चेंडूंमध्ये 71 धावांची खेळी केली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. वेदांत त्रिवेदीने 26 धावांचे योगदान दिले. या खेळींच्या जोरावर भारताने 300 धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाकडून विल बायरोमने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
जेडन ड्रेपरचे शतकी खेळी ठरला व्यर्थ –
ऑस्ट्रेलिया संघाची पण सुरुवाच चांगली झाली नाही. सलामीवीर अॅलेक्स टर्नरने 24 धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर आलेल्या जेडन ड्रेपरने 72 चेंडूंमध्ये 107 धावांची शानदार खेळी केली, ज्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. शेवटी आर्यन शर्माने 44 चेंडूंमध्ये 38 धावा (2 चौकार) केल्या. मात्र, अन्य फलंदाजांचा पाठिंबा न मिळाल्याने ऑस्ट्रेलिया 47.2 षटकांत 249 धावांतच सर्वबाद झाला.
हेही वाचा – ICC T20I Rankings : आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा! ‘या’ तीन खेळाडूंनी पटकावलं अव्वल स्थान
आयुष म्हात्रे आणि कनिष्क चौहानची भेदक गोलंदाजी –
भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रेने 4 षटकांत 27 धावांत 3 विकेट्स घेत शानदार गोलंदाजी केली. कनिष्क चौहानने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने हा सामना 51 धावांनी जिंकला. अशा प्रकारे भारताच्या संतुलित कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या यूथ वनडेत विजय मिळवत त्यांनी ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. वैभव, विहान आणि अभिज्ञानच्या अर्धशतकांनी भारताला भक्कम पाठबळ दिले, तर आयुष आणि कनिष्कच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकायला लावले.





