Ranji Trophy 2024-25 : झारखंडचा संघ जाहीर…! इशान किशनचं चमकलं नशिब, मिळाली मोठी जबाबदारी…

Ranji Trophy 2024 (Ishan kishan) : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी ईशानची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीम इंडियामध्ये निवड झाली होती पण मानसिक तणावामुळे इशानने या मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी बीसीसीआयने ईशानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते पण ईशानने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका त्याला बसला. इतकंच काय तर बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातूनही दूर केलं होतं. तेव्हापासून इशान किशन टीम इंडियाचं दार ठोठावत आहे.
उपरती झाल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नशिब आजमवण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये म्हणजेच बुची बाबू, दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्ये त्याच्या फलंदाजीची जादू दिसली. ईशानने बुची बाबू आणि दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतके झळकावली होती. मात्र टीम इंडियात अजूनही त्याला स्थान मिळालेलं नाही. असं असताना इशान किशनला एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
इशान किशन गेल्या मोसमात रणजी करंडक स्पर्धा खेळला नव्हता. मात्र यावेळी तो या स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. इशान किशन रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन (JSCA) ने बुधवारी 2024-25 हंगामासाठी संघाची घोषणा केली. कर्णधार इशान किशन व्यतिरिक्त ज्या खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे त्यात विराट सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक) यांचा समावेश आहे.
“इशान किशन हा खूप अनुभवी खेळाडू असून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही अनुभव आहे. आम्ही एका तरुण संघाची निवड केली असून, ईशान या संघाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. या रणजी मोसमात आमचा संघ चांगली कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे.”
– सुब्रतो दास (झारखंड संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष)
रणजी स्पर्धेत झारखंडचा पहिला सामना आसामशी होणार आहे. आता रणजी ट्रॉफी स्पर्धेत इशान किशनची कामगिरी कशी असेल याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा केली जाऊ शकते. पण इशान किशनची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता आता संपलेली आहे, कारण आता त्याला रणजी स्पर्धेसाठी झारखंड संघाचे कर्णधारपद सोपविले आहे आणि भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला आता रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
झारखंड संघ खालीलप्रमाणे : ईशान किशन (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विराट सिंह (उपकर्णधार), आर्यमन सेन, नाजिम सिद्दकी, अनुकूल रॉय, शरणदीप सिंह, कुमार सूरज, उत्कर्ष सिंह, सौरभ शेखर, विकास कुमार, सुप्रियो चक्रवर्ती, मनीष, रौनक कुमार, विवेकानंद तिवारी.





