IND U19 vs AUS U19 (2nd Youth Test) : नित्या पांड्याचे हुकले शतक, ऑस्ट्रेलियाविरूध्द पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत…

India U19 vs Australia U19 (2nd Youth Test) : – भारतीय अंडर-19 क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यातील दुसरी युवा कसोटी चेन्नई येथे खेळवली जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारतीय संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत नित्या पांड्या, केपी कार्तिकेय, कर्णधार सोहम पटवर्धन व निखिल कुमार यांनी केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाने पहिल्याच दिवशी 5 गडी गमावून 316 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्याच दिवशी धावांचा डोंगर उभारला. धावफलकावर केवळ 4 धावा लागल्या असताना सलामीवीर वैभव सूर्यवंशी परतला. यानंतर सलामीवीर विहान मल्होत्राने नित्या पांड्यासोबत 56 धावांची भागीदारी केली. 10 धावा काढून विहान बाद झाल्यानंतर नित्या पांड्या व केपी कार्तिकेय यांनी तिसऱ्या गड्यासाठी 112 धावांची दमदार भागीदारी केली. दरम्यान नित्या पांड्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. नित्याने 12 चौकारांसह 94 धावांची खेळी करून बाद झाल्या. त्यानंतर केपी कार्तिकेय देखील 74 धावांची खेळी करून माघारी परतला. त्याने 9 चौकार व 1 षटकार लगावला.
भारताच्या 185 धावांवर 4 गडी बाद झाले असताना आलेल्या कर्णधार सोहम पटवर्धन व निखिल कुमार यांनी 110 धावांची भागीदारी करताना भारताला 300 धावांच्या उंबरठ्यावर आणून सोडले. यावेळी निखिल कुमार 61 धावा (7 चौकार) करून तंबूत परतला. यानंतर कर्णधार सोहम पटवर्धन व हरिवंश पंगलीया यांनी अजून पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर कर्णधार सोहम पटवर्धन 61 (6 चौकार) तर हरिवंश पंगलीया 7 (1 चौकार) खेळत आहेत. हॅरी होकेस्ट्राने 2 तर ऑली पॅटर्सन, ख्रिश्चन हॉवे व विश्व रामकुमार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
IND vs BAN 1st T20 : हार्दिक पांड्यानं मोडला कोहलीचा मोठा विक्रम, ‘या’बाबतीत मिळवलं अव्वल स्थान….
संक्षिप्त धावफलक :
भारत : 90 षटकांत 5 बाद 316 : पहिला दिवसअखेर : नित्या पांड्या 94 (12 चौकार), केपी कार्तिकेय 74 (9 चौकार,1 षटकार), सोहम पटवर्धन नाबाद 61 (6 चौकार), निखिल कुमार 61 (7 चौकार), हरिवंश पंगलीया नाबाद 7 (1 चौकार), हॅरी होकेस्ट्रा 12-5-29-2, ऑली पॅटर्सन 12-1-45-1, ख्रिश्चन हॉवे 11-2-26-1, विश्व रामकुमार 21-2-74-1.
.



