IND A vs USA : इंडिया ए’चा अमेरिकेवर दणदणीत विजय! जगदीशनचे शतक अन् तिलक वर्माचे अष्टपैलू पुनरागमन
IND A vs USA : सोमवारी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंडिया ए संघाने अमेरिकेचा (USA) ३८ धावांनी पराभव केला.

IND A vs USA IND A beat USA by 38 runs : टी-२० वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्यापूर्वी भारतीय ‘ए’ संघाने सराव सामन्यात आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंडिया ए संघाने अमेरिकेचा (USA) ३८ धावांनी पराभव केला. एन. जगदीशनचे वादळी शतक आणि दुखापतीतून सावरलेल्या तिलक वर्माची अष्टपैलू कामगिरी या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरली.
एन. जगदीशनचे स्फोटक शतक; भारताचा २३८ धावांचा डोंगर
अमेरिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर प्रियांश आर्या (२८) आणि एन. जगदीशन यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. जगदीशनने अमेरिकन गोलंदाजांची पिसे काढत अवघ्या ५५ चेंडूंत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची शतकी खेळी केली.
तसेच शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतलेल्या तिलक वर्माने २४ चेंडूंत ३८ धावा करत आपली लय प्राप्त केल्याचे दाखवून दिले. त्यानंतर कर्णधार आयुष बडोनीने अवघ्या २६ चेंडूंत ६० धावांची नाबाद खेळी करत भारताला २० षटकांत २३८ धावांपर्यंत पोहोचवले.
N jagadeeshan scored the maiden century on Big stage #indavsusa #T20WorldCup2026 #T20WorldCupwarmup pic.twitter.com/wZEE2D7htj
— sportscine 360° (@Hari6prasath666) February 2, 2026
अमेरिकेचा लढा; रवी बिश्नोईची फिरकी अन् नमन धीरचा फिनिशिंग टच
प्रत्युत्तरात २३९ धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने चांगली झुंज दिली. अँड्रियू गस (४४) आणि संजय कृष्णमूर्ती (४१) यांनी आक्रमक फलंदाजी केली. मात्र, मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. फिरकीपटू रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेत अमेरिकेच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. यानंतर २० व्या षटकात नमन धीरने २ विकेट्स घेत अमेरिकेचा डाव २०० धावांवर गुंडाळला. खलील अहमदने २, तर अशोक शर्मा आणि तिलक वर्माने प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
तिलक वर्माचा अफलातून झेल –
तिलक वर्माची अष्टपैलू कामगिरी
केवळ बॅट आणि बॉलनेच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही तिलक वर्माने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने मिलिंद कुमारचा धावत जाऊन घेतलेला झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या कामगिरीमुळे मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची चिंता मिटली आहे.





