Satara | शुक्रवारी टेंभू योजनेच्या कामांचा शुभारंभ

सातारा, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील मायणी, कलेढोणसह २१ आणि माण तालुक्यातील कुकुडवाडसह २१ गावांचा पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ हटविणाऱ्या टेंभू सिंचन योजनेच्या प्रत्यक्ष कामांची सुरुवात शुक्रवारी होणार आहे.
उत्तर माणमधील ३२ गावांना पाणी देणाऱ्या आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या योजनेच्या पाणीपूजनाचा कार्यक्रम रविवारी होणार असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
पाणी योजनांविषयी माहिती देताना आ. गोरे म्हणाले, गेल्या १५ वर्षात अथक प्रयत्न करुन आपण उरमोडी,तारळी,जिहेकठापूर या योजनांचे पाणी मतदारसंघात आणून ७० टक्के भागाची टंचाई कमी करुन बागायती शेतीचे आणि कारखानदारीचे स्वप्न पूर्ण केले.
उत्तर माणची आंधळी उपसा सिंचन योजना पूर्ण करुन आणि दोन्ही तालुक्यातील ४२ गावांसाठी टेंभू योजनेचे काम सुरु करुन मी दिलेले शब्द पूर्णत्वाला नेत आहे.
खटाव तालुक्यातील मायणी, कलेढोण, विखळे, गारवडी, पडळ ते पेडगावपर्यंतचा २१ गावांचा तर माणमधील कुकुडवाडसह २१ गावांचा पट्टा पाण्यापासून वंचित होता. या भागाला पाणी मिळावे म्हणून अनेक लढे उभारले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या भागाला पाणी देण्याचा शब्द दिला होता.
कृष्णा लवादाचे फेरजलनियोजन करुन त्यांनी या भागासाठी अडिच टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतल्यामुळे टेंभू योजना मार्गी लागली आहे.
या योजनेसाठी साडेसातशे कोटींचा निधी मंजूर होवून कामांची निविदा निघाली आहे. या भागाचा पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ हटवणाऱ्या टेंभू योजनेच्या प्रत्यक्ष कामांची सुरुवात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता विखळे फाटा येथे होणार आहे.
माण तालुक्याच्या आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेचे पाणी आले आहे. उत्तर माणमधील वंचित ३२ गावांना हे पाणी देणारी वाढीव आंधळी उपसा सिंचन योजना विक्रमी कमी कालावधीत मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे काम पूर्णत्वाला गेले आहे.
योजनेच्या पाण्याचे पूजन समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला आहे. दुष्काळावर मात करणाऱ्या या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमांसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आ. दिलीपराव येळगावकर, अरुण गोरे, डॉ. संदीप पोळ, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, गणेश सत्रे, विलासराव देशमुख, विकल्प शहा, किसनशेठ सस्ते आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
मी कुणाच्या वाटेला जात नाही
एक तर मी कुणाच्या वाटेला जात नाही,कुणी माझ्या वाटेला गेला तर सोडतही नाही. पाण्याला विरोध कराणाऱ्या काही गद्दार औलादी आपल्या मातीत आजही आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात गद्दारी कधी यशस्वी झाली नाही.
माता-भगिनींच्या सन्मान सोहळ्याला मिळालेला विक्रमी प्रतिसाद काहींना खुपला आहे. कुणी बीडीओंना साडी देण्याचा स्टंट करुन स्वतःचे हसे करुन घेत आहे. कालच म्हसवड आणि वडूजच्या भुयारी गटर कामांसाठी शेकडो कोटींचा निधी मिळाला असल्याचे आ. गोरेंनी सांगितले.





