शिरुर तालुक्यात जागा विक्रीला नकार दिल्याने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

न्हावरे – आंबळे (ता. शिरुर) येथे जागा विक्रीस नकार दिल्याचा राग मनात धरुन एका ६० वर्षीय शेतकऱ्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील आंबळे गावात घडली आहे. या प्रकरणी संजय बाळासाहेब बेंद्रे याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास नारायण बेंद्रे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. आंबळे) यांनी याबाबत फिर्याद दिली असून दि ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२१ वाजण्याच्या सुमारास महेश विष्णु करे यांच्या बांधकाम सुरु असलेल्या स्लॅबवर हा प्रकार घडला. आरोपी संजय बेंद्रे याने बांधकामासाठी जागा कमी पडत असल्याचे सांगत फिर्यादीकडे त्यांच्या शेजारच्या ४ फूट रुंद व ६० फूट लांबीच्या जागेची मागणी केली. मात्र, फिर्यादीने स्पष्ट नकार देत विषय सोडून देण्यास सांगितले.
त्याच क्षणी आरोपीचा संताप अनावर झाला. फिर्यादी जिना उतरुन खाली जात असतानाच आरोपीने तेथेच पडलेला लोखंडी गज उचलून फिर्यादीच्या पाठीवर, डोक्यावर व डाव्या पायावर बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे विलास बेंद्रे खाली कोसळले. एवढ्यावर न थांबता आरोपीने त्यांना पायाला धरुन ओढत स्लॅबवरुन खाली फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच “आज तुला संपवतो, स्लॅबखाली टाकून देतो,” अशी जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने पुन्हा लोखंडी गजाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी गंभीर जखमी अवस्थेत विलास बेंद्रे यांनी स्लॅबच्या कॉलमला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे आंबळे गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीविरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत. जागेच्या वादातून थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत मजल गेल्याने शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा:




