Bhor : दिवाळीनंतर बळीराजा शेती कामात व्यस्त
Bhor :मागील आठवड्यात अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता. १० ते १२ दिवसांपूर्वी हिरडस मावळ व वीसगाव खोऱ्याच्या पट्ट्यात प्रचंड मुसळधार पाऊस झाल्याने तेथील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

महुडे : भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रातील वेळवंड खोऱ्यासह ग्रामीण भागात सध्या भात कापणी व भरडणीच्या (मळणी) कामांना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर बळीराजा पूर्णपणे शेतीच्या कामात मग्न झाला असून, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी असणारे कुटुंबिय देखील गावात आल्याने शेतीच्या कामात मोलाची मदत करत आहेत. भोर परिसरात वर्षाच्या अन्नसुरक्षेसाठी प्रमुख पीक म्हणून भात पिकाकडे पाहिले जाते.
मागील आठवड्यात अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता. १० ते १२ दिवसांपूर्वी हिरडस मावळ व वीसगाव खोऱ्याच्या पट्ट्यात प्रचंड मुसळधार पाऊस झाल्याने तेथील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. काढणीला आलेले भात पीक शेतातच कुजण्याची किंवा गळून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती; मात्र आता हवामानात बदल होऊन थंडीचा कडाका वाढल्याने आणि पावसाचे सावट दूर झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. यामुळे शेतातील कामांना वेग आला असून, ऐन दिवाळीच्या सणातही शेतकरी भात कापणी आणि भरडणीच्या कामात व्यस्त आहेत. ज्या शेतकऱ्यांची भात लागण उशिरा झाली होती, ते शेतकरी मात्र अद्याप भात काढणीच्या प्रतीक्षेत आहेत.
रब्बी हंगामाची तयारी व चारा पिकांवर भर
जी भात खाचरे मोकळी झाली आहेत, तसेच ज्या शेतातून भुईमूग व सोयाबीन काढून झाले आहे, त्या शेतात आता रब्बी हंगामातील पिके पेरण्यासाठी शेतकरी मशागत करू लागले आहेत. यावर्षी पुरेशा पावसामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याचा इशारा शासनाने दिल्याने, जनावरांसाठी ज्वारी, मका यांसारखी चारा-उपयोगी पिके घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शेतकरी आता तीच पिके पेरण्याच्या तयारीला लागले आहेत.
उत्पादनात घट होण्याची भीती
यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने शासनाने भोर तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात उत्पन्नात यंदा मोठी घट होणार आहे. सध्या भात पिकाचा उतारा अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात मिळत असल्याची माहिती बसरापूरचे पोलीस पाटील विठ्ठल झांजले, तसेच शेतकरी रमेश झांजले आणि रवींद्र पन्हाळकर यांनी दिली आहे.





