Alephata : आरक्षित तिकीट असूनही महिलेला बसस्थानकापासून दूर सोडले
Alephata : ललिता भुजबळ यांनी पारनेर आगाराच्या पारनेर-मुंबई एसटी बसमध्ये आपले आसन आरक्षित केले होते. प्रवासाचे आरक्षण करताना प्रवाशांना अपेक्षा असते की, त्यांनी निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचविण्याची जबाबदारी एसटी प्रशासन पार पाडेल.

आळेफाटा : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पारनेर आगाराच्या पारनेर-मुंबई एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या आणि नियमानुसार आसन आरक्षित केलेल्या बेल्हे (ता. जुन्नर) येथील ललिता सुदाम भुजबळ या ज्येष्ठ महिलेला मुंबईतील ठाणे येथील खोपट बस स्थानकावर न सोडता तब्बल तीन किलोमीटर अंतरावरील तीनहातनाका परिसरात उतरविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संबंधित महिलेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तर ठाण्यात बसस्थानकावर तिची वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांचीही प्रचंड धावपळ उडाली.
ललिता भुजबळ यांनी पारनेर आगाराच्या पारनेर-मुंबई एसटी बसमध्ये आपले आसन आरक्षित केले होते. प्रवासाचे आरक्षण करताना प्रवाशांना अपेक्षा असते की, त्यांनी निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचविण्याची जबाबदारी एसटी प्रशासन पार पाडेल. मात्र, मुंबई प्रवासादरम्यान चालक आणि वाहक यांनी ही बस ठाण्यातील खोपट बसस्थानकावर जात नसल्याचे सांगत त्यांना खोपट बसस्थानकापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन हात नाका येथे उतरविले आणि बस पुढील प्रवासासाठी निघून गेली.
ग्रामीण भागातून मुंबईसारख्या महानगरात प्रवास करणाऱ्या महिलेला अनोळखी ठिकाणी उतरविल्यामुळे मानसिक त्रासाबरोबरच अतिरिक्त प्रवासाचा खर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला. विशेष म्हणजे, आरक्षण करून प्रवास केल्यानंतरही इच्छित बसस्थानकापर्यंत पोहोचण्याची खात्री नसेल, तर आरक्षणाचा उपयोग काय? असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत ललिता भुजबळ यांच्या मुलाने एसटी महामंडळाच्या अधिकृत ऑनलाइन तक्रार प्रणालीद्वारे तक्रार नोंदविली आहे. संबंधित चालक आणि वाहकांकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.





