Sanjay Raut : गुरुवारचा दिवस संजय राऊत-एकनाथ शिंदे यांच्यातील अनपेक्षित भेटीमुळे गाजला. एका वृत्तवाहिनीसाठी मुलाखत देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडत असतानाच त्यांच्यासमोर अचानक संजय राऊत आले. यावेळी दोन्ही नेत्यांचे हस्तांदोलन आणि काहीवेळ बोलणं झालं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात या भेटीची जोरदार चर्चा रंगली. आता या भेटीवर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमची भेट अनपेक्षित होती, असे संजय राऊत म्हणाले. शिंदे यांच्या भेटीविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “कसं काय ठरवून भेटेन? अशा भेटी अनपेक्षित असतात. जरी राज्याचे बेकायदेशीर असले तरी ते उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती कार्यक्रमात आली म्हणून बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यात नाही. माझा कार्यक्रम झाल्यावर ते समोर होते. हाय हॅलो झालं आणि निघून गेलो”. अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित भेटीविषयी दिली. भेटीनंतर काय वाटलं या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “कशाकरता वाटावं? त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार आहे? ते भाजपासोबत सत्तेत आहेत. त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत आहे. अमित शाह त्यांच्या पक्षाचे नेते आणि आमच्या दृष्टीने महाराष्ट्राचे दुश्मन, शत्रू आहेत. म्हणून तर दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनांविरोधात लढत आहेत.” राऊतांनी लगावला टोला “एकेकाळी त्यांचं येथे येणं जाणं होतं. आमचे सहकारी होते, जवळचे मित्र होते हे सत्य आहे. आता त्यांनी पलायन केलं त्याला आम्ही काय करणार. आम्ही आहोत तिथेच आहोत. जे नितीमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर पळून जाणारे नजरेला नजर भिडवू शकत नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. चर्चांना उधाण संजय राऊत पत्रकार परिषदेमधून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात. त्यांचा उल्लेख त्यांनी मिंधे असा केल्याचे अनेकदा पहायला मिळते. त्यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे देखील जशास तसे म्हणून प्रत्युत्तर देतात. सकाळचा नऊ वाजताचा भोंगा असा उल्लेख शिंदे करत असतात. थोडक्यात दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष आणि टीका होते. मात्र, ज्यावेळी दोन्ही नेते अनपेक्षित कारणामुळे का होईना पण एकमेकांसमोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. हेही वाचा : “आम्ही आधी गोळ्या घालू, मग बोलू…” ; ग्रीनलँड वाद वाढल्यानंतर ‘या’ देशाचा अमेरिकेला इशारा