Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन
महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा! अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासंदर्भात सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात व्यवसाय करताना येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मराठी भाषेत संवाद साधता येणे महत्त्वाचे आहे. रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केले.
महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा! अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासंदर्भात सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक प्रवासी वाहनचालकाला प्रवाशांशी सहज आणि आत्मविश्वासाने संवाद साधता यावा, या उद्देशाने परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० हून अधिक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू करून, सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सरनाईक म्हणाले, राज्यात ९ लाखांहून अधिक रिक्षा व टॅक्सी चालकांकडे नोंदणी व बॅज (प्रमाणपत्र) आहेत. राज्यात सुमारे ९ लाख ७८ हजार रिक्षा व टॅक्सी चालक कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे ९ लाख १६ हजार ऑटोरिक्षा चालक आणि ६१ हजारांच्या आसपास टॅक्सी चालकांचा समावेश आहे.
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षाचालकांची संख्या ४ लाख ४० हजार २३८, तर टॅक्सीचालकांची संख्या ४३ हजार १०६ इतकी आहे. या सर्व चालकांनी मराठी भाषा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले. मात्र, राज्यातील मोठ्या संख्येने अमराठी चालक अद्याप व्यावहारिक मराठीच्या प्रशिक्षणापासून दूर आहेत.
त्यामुळे उर्वरित चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रशिक्षण केंद्रांबरोबरच ऑनलाइन माध्यमातूनही व्यावहारिक मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले.






