लक्षवेधी : युरोपाला उष्णतेच्या झळा
नेहमी वीसेक तापमान (Temperature) असलेल्या युरोपात तापमानाने चाळीसचा पारा पार केला आहे. तीव्र उष्णतेच्या झळांमुळे अंगाची लाही लाही होत असल्यामुळे थंडावा मिळण्यासाठी चाळीस माणसे पाण्यात उतरली आणि बुडून मेली. ही घटना आहे चक्क फ्रान्समधील!

– नरेंद्र क्षीरसागर
Temperature : नेहमी वीसेक तापमान (Temperature) असलेल्या युरोपात तापमानाने चाळीसचा पारा पार केला आहे. तीव्र उष्णतेच्या झळांमुळे अंगाची लाही लाही होत असल्यामुळे थंडावा मिळण्यासाठी चाळीस माणसे पाण्यात उतरली आणि बुडून मेली. ही घटना आहे चक्क फ्रान्समधील!
वसंत ऋतूतील जीवघेण्या उष्णतेमागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हीट डोम होय. उत्तर आफ्रिकेतून येणार्या हवेचा मोठा दबाव असणारा हीट डोम ही एक वातावरणातील अभेद्य स्थिती असून ती हळूहळू वाटचाल करत आहे. या हीट डोमने (Temperature) युरोपवर गरम वारे बांधून ठेवले आहे, जसे एका उकळत्या पाण्यावर झाकण ठेवल्यासारखे. युरोपीय संघाच्या कॉपरनिकस क्लायमेंट चेंज सर्व्हिसच्या मते, गेल्या 25 वर्षांत युरोपात अशा प्रकारचे हवामान दिसून येते आणि त्यामुळे अनेकदा खूप गरम वारे वाहताना दिसतात.
इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये क्लायमेट सायन्सचे प्रोफेसर फ्रेडेरिक ओटोच्या मते, पूर्वी युरोपात अशा प्रकारची उष्णता कधीतरी पाहावयास मिळत असे. विशेष म्हणजे कमाल तापमान अधिक राहात असताना उष्ण वारे अनुभवास येत होते. पण आता विक्रमी उष्णता ही हवामान बदलाच्या परिणामाची जाणीव करून देत आहे.
अशा स्थितीत जीवाश्म इंधनामुळे होणार्या उत्सर्जनामुळे होणारा ग्रीन हाउस इफेक्ट हा वाढत्या तापमानाला (Temperature) कारणीभूत असल्याचे म्हणणे घाईचे ठरू शकते. अर्थात 2003 नंतर युरोपात उष्णतेच्या लाटेमुळे घडलेल्या घटनांचा अभ्यास केला असता ते वातावरणाचे सत्यकथन करतात.ब्रिटनची संस्था ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन’च्या हवामान तज्ज्ञांच्या मते, मानवामुळे होणार्या हवामान बदलामुळे वातावरणाचे धोकादायक रूप हे पूर्वीपेक्षा अधिक वेळा पाहावयास मिळत आहे. तसेच त्याची तीव्रता देखील वाढली आहे. प्रो. फ्रेडरिक ओटे या संस्थेचे सहसंस्थापक आहेत.
एप्रिलमध्ये जारी ‘युरोपियन स्टेट ऑफ द क्लायमेट’च्या ताज्या अहवालानुसार 2025 च्या काळात युरोपात किमान 95 टक्क्यांपेक्षा अधिक दिवसांत सरासरी कमाल तापमान अधिक असल्याचे नोंदले गेले आहे. या भीषण उष्णतेचे कारण म्हणजे धु्रवीय सर्कलसारख्या थंड वातावरणातील तापमान 30 अंशापेक्षा अधिक राहणे होय. याशिवाय समुद्राच्या पृष्ठभागातील तापमान आजवरच्या इतिहासात सर्वात उष्ण असल्याचे नोंदले गेले.
अहवाल तयार करणार्या संस्थांपैकी एक ‘युरोपीय सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टस’चे प्रमुख फ्लोरिया पेपेबर्ग म्हणाले, युरोप आता सर्वात वेगाने उष्ण होणारे खंड बनले आहे आणि त्याचे दुष्परिणाम आतापासूनच धोकादायक रूपातून पाहावयास मिळत आहे. वास्तविक युरोप हा संपूर्ण जगाच्या तुलनेत दुपटीने उष्ण होत आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत आज युरोपचे तापमान सरासरी 2.5 अंशांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण जगाचा विचार केल्यास तज्ज्ञांनी जागतिक पातळीवर तापमान वाढीची सरासरी केवळ 1.4 अंश सेल्सिअस नोंदविली आहे.
युरोपात वेगाने उष्णता वाढण्यामागचे कारण काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची भौगोलिक स्थिती. प्रत्यक्षात युरोप हा थेटपणे आर्क्टिकशी जोडलेला असून आर्क्टिकहे वेगाने उष्ण होणार्या जगातील एकमेव ठिकाण ठरत आहे. युरोपीय संघाच्या कॉपरनिकस क्लायमेट चेंज सेवेच्या डेटानुसार, उत्तर ध्रुवाजवळ सरासरी तापमानाचे प्रमाण 3.3 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले आहे.
यामागचे कारण म्हणजे आर्क्टिक समुद्राचे पाणी वाढणे आणि बर्फ तयार होत नसल्याने ओकेबोके दिसणारे पर्वत सूर्याचा प्रकाश अधिक शोषून घेत आहेत. बर्फाच्छादित पर्वत हे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करतात आणि त्याचे किरण परत पाठवतात. या संपूर्ण प्रक्रियेला अल्बेडो इफेक्ट असे म्हणतात. पण आता बर्फविना असणारे पर्वत उष्णता अंगावर घेत आहेत.
या गोष्टी सध्या युरोपात घडत आहेत. युरोपमध्ये संपूर्ण वर्षभर किंवा उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत ज्या ठिकाणी बर्फ असायचा त्या आल्प्सच्या पर्वतरांगांत आता वेगाने बर्फ वितळत आहे. जेव्हा बर्फ काढला जातो, तेव्हा जमीन सूर्यप्रकाश परत पाठवू शकत नाही आणि उलट ती शोषून घेते. या कारणामुळे तेथे उष्णता वेगाने वाढताना दिसून येते.
शास्त्रज्ञांच्या मते, युरोपात वाढत्या उष्णतेचा संबंध ‘जेट स्ट्रिम’च्या बदलत्या रूपाशी देखील आहे. जेट स्ट्रिम हा एकप्रकारे आकाशात खूप उंचीवर वाहणारा वारा असून तो पश्चिमेकडून युरोपकडे जातो. पूर्वी हे वारे शांत आणि स्थिर असायचे. मात्र, हवामान बदलामुळे त्याच्यात बदल झाला आहे. स्थिर असणारे वारे आता हवामान बदलामुळे विस्कळीत झाले आहेत. हवामानाच्या स्वरूपात बदल होत असल्याने वार्यांना अडथळे येत आहेत. परिणामी बराच काळ उष्णता सहन करावी लागते.
जर्मनीच्या ‘पॉटसडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेंट इम्पॅक्ट रिसर्च’मधील संशोधक एफी राउसी यांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये एक अभ्यास करण्यात आला. त्यात म्हटल्यानुसार, युरोपात उष्ण वातावरण राहण्याचा कालावधी वाढला आहे. आकाशातील वेगाने वाहणारे ‘जेट स्ट्रिम’ आता दोन भागात विभागले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे युरोपच्या प्रामुख्याने पश्चिम भागात उन्हाळ्याचे दिवस वाढले आहेत.
उत्तर अटलांटिककडून युरोपकडे येणार्या वादळी वार्याचा मार्ग जेथे थांबतो त्या भागावर याचा परिणाम अधिक राहतो. सर्वसाधारणपणे युरोपचे हवामान अटलांटिक महासागराच्या स्थितीवर अवलंबून आहे. मात्र, जेव्हा जेट स्ट्रिम दोन भागात विभागले जाते, तेव्हा हे थंड वारे उत्तरेकडे वळतात आणि या कारणामुळे पश्चिम युरोपात सातत्याने उष्णता असते.
या स्थितीची दुसरी बाजू म्हणजे, पर्यावरणाची समस्या कमी करण्याच्या प्रयत्नामुळे युरोपात उष्णता वाढत आहे. 2025 च्या ‘युरोपीय स्टेट ऑफ द क्लायमेट’च्या बातमीनुसार, 1980च्या दशकात हवेतील गुणवत्ता राखण्याबाबत लागू केलेले कडक नियम पाहता वातावरणातील प्रदूषण कमी झाले, मात्र आता हेच नियम तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहेत.
स्वच्छ हवेशी संबंधित नियमांची अंमलबजावणी होण्यापूर्वी गाड्यांचा धूर, कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारे लहान आकारातील सल्फेट आणि नायट्रेटचे कण सूर्यप्रकाशाला परत पाठवत असत. त्याची तीव्रता कमी ठेवण्यास मदत करत असत. त्यामुळे काही प्रमाणात युरोपात थंड वातावरण असायचे. परिणामी ग्रीनहाउस गॅस उत्सर्जनामुळे वाढणारे तापमान काही प्रमाणात रोखण्यास मदत मिळायची. अर्थात तज्ज्ञांच्या मते, याचा अर्थ असा नाही की जगाने प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सोडून द्यायला पाहिजेत.






