Pune Rain: गेल्या ९४ वर्षांतील सर्वात कोरडा जून! मान्सून रखडल्याने ६ वर्षांतील रेकॉर्डब्रेक तापमान
Pune Rain: पुण्यात जूनच्या पहिल्या २० दिवसांत पावसाचा पत्ताच नाही; १९३२ नंतरचा सर्वाधिक कोरडा महिना ठरण्याची शक्यता.

Pune Rain – यंदा जून महिन्याचे दहा दिवस बाकी असले तरी पावसाचे कोरडे सावट आहे. ८ जून रोजी दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मान्सूनची गती पूर्णपणे मंदावली. अरबी समुद्रातील वारे कमकुवत झाल्यामुळे मान्सूनचा प्रवास रखडला असून, राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ७८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
पुण्यात जूनच्या पहिल्या २० दिवसांत पाऊस पडलाच नाही. मान्सूनच्या पावसाचे राहू द्या, मान्सून पूर्व पावसानेही हजेरी लावली नाही. त्यामुळे गेल्या ९४ वर्षांतील (१९३२ नंतरचा) हा सर्वात कोरडा जून ठरला आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२३ मध्येही मान्सून तब्बल २५ जून रोजी मुंबईत पोहोचला होता, २००९ मध्ये २१ जूनला त्याचे आगमन झाले होते. १९५८ मधील जूनचा पहिला पंधरवडा पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्वाधिक कोरडा ठरला होता.
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यातील पावसाचा खंड संपणार असून, २२ ते २३ जून पासून मान्सूनची वाटचाल सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरासाठी या दिवशी यलो अलर्ट दिला आहे. या काळात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुणे शहरात गतवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल झाला होता.
सरासरीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. यंदा मान्सून तर लांबलाच, मात्र मान्सून पूर्व पावसानेही दांडी मारल्यामुळे या महिन्यात गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसला, तरी २३ ते २५ जूननंतर मान्सूनचा प्रवास गतिमान होईल.
पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्याासह अनेक भागांत खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. कृषी आणि हवामान खात्याने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय घाईघाईने पेरण्या करू नये असा सल्ला दिला आहे. आगामी आठवड्यात सर्वत्र दिलासादायक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.





