अग्रलेख : शतायुषी अडवाणी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (L. K. Advani) यांनी आता वयाच्या शंभरीत पदार्पण केले आहे. त्यांचा 99वा वाढदिवस साजरा झाला.

L. K. Advani : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (L. K. Advani) यांनी आता वयाच्या शंभरीत पदार्पण केले आहे. त्यांचा 99वा वाढदिवस साजरा झाला. वयाच्या शंभरीपर्यंत राजकारणात दीर्घकाळ सक्रिय असलेले लालकृष्ण अडवाणी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा देशाचा इतिहास अनुभवला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या आजवरच्या वाटचालीत प्रत्येक महत्त्वाची घटना त्यांच्यासमोर घडली आहे, त्यामुळे या सगळ्या घटनांचे ते सध्या हयात असलेले एकमेव साक्षीदार आहेत.
अडवाणी (L. K. Advani) यांची राजकीय कारकीर्द अनेक वळणे घेत स्थिरावलेली आहे. अगदी सुरुवातीपासून ते जनसंघ, जनता पार्टी आणि नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीत केंद्रीय पातळीवर राजकारण करणारे एक महत्त्वाचे नेते आहेत. काँग्रेस विरोध हा त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा मूळ गाभा राहिला आहे. भारतीय जनता पक्षाचा पाया विस्तारून तो मजबूत करण्यासाठी ज्या बड्या नेत्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यात अडवाणी यांचे नाव अग्रेसर आहे. काय केले म्हणजे पक्षाचे महत्त्व वाढेल आणि जनमानसात पक्षाला स्थान मिळेल याचा पक्का आराखडा त्यांच्या डोक्यात होता.
अगदी सुरुवातीच्या काळात जनसंघ आणि 1980 नंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाला तसा बेताचाच लोकपाठिंबा मिळत असे. त्यामुळे हा पक्ष देशात कधी स्वबळावर सत्तेवर येईल याचे स्वप्न त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनासुद्धा पडत नसावे. सुरुवातीच्या काळात सततच्या पराभवांमुळे जनसंघ हा पक्ष बंद करून तो जनता पार्टीत विलीन करण्याची वेळ आली होती, इतकी या पक्षाची हालत बिकट होती.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसच्या विरोधात देशभर एक मोठी चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पर्याय म्हणून एक समर्थ आणि भक्कम राजकीय पक्ष असण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या पुढाकाराने समाजवादी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विविध राजकीय पक्षांचे एकमेकात विलीनीकरण करून जनता पार्टी अस्तित्वात आली.
हा जनता पार्टीचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आणि या पक्षाने 1977 यावर्षी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव करीत केंद्रात सत्ता मिळवली. त्या आधारे लालकृष्ण अडवाणी यांना केंद्रात मंत्रिपद भूषवण्याचीही संधी मिळाली पण जनता पार्टीचे सरकार फार काळ टिकले नाही. समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांमधील अहंकार जनता पार्टीच्या पुढील वाटचालीला अडचणीचा ठरला आणि हा पक्ष फुटून जेमतेम अडीच वर्षातच तो सत्तेवरून पायउतार झाला. त्यानंतर जनता पार्टीची अनेक शकले झाली.
समाजवादी विचारांच्या नेत्यांनी कायमच हिंदुत्ववादी विचारांच्या जनसंघी नेत्यांचा दुस्वास केला. त्यामुळे मूळ जनसंघीय असलेल्या त्या वेळच्या राजकीय नेत्यांनी आपली वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात या भाजपला केवळ दोनच जागा जिंकता आल्या. इतक्या अभतपूर्व नामुष्कीतून हा पक्ष स्वबळावर पुढे इतका फोफावला की अलीकडच्या काळात या पक्षाने दोन वेळा स्वबळावर केंद्रात बहुमत मिळवून सरकार स्थापन केले आहे.
आज मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष तिसर्यांदा केंद्रात सत्तेवर आला. या यशाची पायाभरणी करण्याचे श्रेय अडवाणी यांनाच जाते. भारतीय जनता पक्षात पूर्वी वाजपेयी आणि अडवाणी हे दोन भिन्न स्वभाव वैशिष्ट्ये असलेले नेते होते. त्यात वाजपेयी सौम्य आणि समन्वयवादी नेतृत्व मानले गेले, तर अडवाणी मात्र हार्ड लाइनर म्हणजेच जहाल विचारसरणीचे नेतृत्व मानले गेले. तथापि अडवाणी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा व्यवहारी लवचिकताही दाखवली आहे.
भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा लौकिक अडवाणी यांनीच प्रस्थापित केला. देशातील काळा पैसा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे विषय त्यांनी केंद्रस्थानी आणून त्याद्वारे काँग्रेसला चांगलेच नामोहरम केले. अयोध्येतील राम मंदिरासाठी त्यांनी काढलेली रथयात्रा तर इतिहास प्रसिद्धच आहे. त्या यात्रेमुळेच भारतीय जनता पक्षाला त्यावेळी 180 जागांपर्यंत मजल मारता आली होती.
देशाच्या राजकीय पटलावर भाजपचा हा जो उदय झाला त्याचे एकतर्फी श्रेय लालकृष्ण अडवाणी यांनाच द्यावे लागेल. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत हवाला डायरी प्रकरणासारख्या भ्रष्टाचार प्रकरणालाही त्यांना तोंड द्यावे लागले होते. पण हवाला डायरीत आपले नाव असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा दिला होता.
एवढेच नव्हे तर या प्रकरणातून आपण जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत संसदेत आपण पुन्हा पाय ठेवणार नाही अशी भूमिकाही त्यांनी त्यावेळी घेतली होती. नंतर या प्रकरणातून ते निर्दोष साबित झाले आणि त्यानंतर मात्र अडवाणी यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पक्षात वाजपेयी यांच्यापेक्षा अडवाणी यांचा मान आणि वजन किंचित जास्त असतानाही स्वतः लालकृष्ण अडवाणी यांनी मुंबईतील जाहीर सभेत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घोषित केले होते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा पक्षाला खूपच लाभदायी ठरला.
पण नंतरच्या काळात मात्र त्यांना अत्यंत अपमानास्पद अवहेलना स्वीकारावी लागली, त्याचे त्यांच्या समर्थकांना वैषम्य वाटल्याखेरीज राहिले नाही. विशेषतः मोदींचा उदय झाल्यानंतर अडवाणी (L. K. Advani) यांचे पद्धतशीर खच्चीकरण केले गेले आणि त्यांना जबरदस्तीने मार्गदर्शक मंडळात ढकलून राजकारणातून निवृत्त केले गेले. पण तरीही पक्षहितासाठी त्यांनी आजतागायत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली नाही.
आज ते आयुष्याच्या शंभरीत पदार्पण करताना त्यांचा हा सगळा दीर्घ राजकीय वाटचालीचा सारीपाट आपसूकच डोळ्यासमोरून जातो. आज दिल्लीतील निवासस्थानी मूकपणे सध्याची सगळी राजकीय परिस्थिती पहात बसलेले अडवाणी पुस्तक रूपाने का होईना कधीतरी आपले मन मोकळे करतील असे वाटते. या ज्येष्ठ नेत्याला शतायुषी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.






