Lonavala News : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची लोणावळा-खंडाळाकडे मोठी गर्दी होत असताना, प्रशासनाने कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. विशेषतः लोणावळ्यातील दोन सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणजे लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट हे दोन दिवसांसाठी पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. काय आहे कारण? वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या दिवशी अपेक्षित अत्यंत मोठ्या गर्दीमुळे वन्यजीव संरक्षण, जैवविविधता जपणे आणि पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे. यंदा लाँग वीकेंड असल्याने पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, गर्दी नियंत्रणात आणणे कठीण होऊ शकते. त्यामुळे वन विभागाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. कोणत्या पॉइंट्सवर बंदी? लायन्स पॉइंट टायगर पॉइंट या दोन्ही ठिकाणी ३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ या दोन दिवसांसाठी पर्यटकांना प्रवेश बंद राहील. या पॉइंट्सवरून मिळणारे पॅनोरॅमिक व्ह्यू, डोंगररांगड्या, खिंडी आणि थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, पण यंदा न्यू ईयर प्लॅनमध्ये मोठा बदल होणार आहे. दरम्यान, लोणावळा पोलिसांनी नाकाबंदी आणि ट्रॅफिक नियंत्रण करून मद्यपान, अनुशासनभंग किंवा ड्रंक ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे. भुशी धरण, लोणावळा लेक, तुंगार्ली लेक, पवना डॅम यांसारख्या इतर ठिकाणीही मोठी गर्दी अपेक्षित आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि व्हिलांमध्ये बुकिंग पूर्ण झालेल्या आहेत, पण सुरक्षितता आणि ट्रॅफिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.