Pimpri : लोणावळ्यात पर्यटनावर बंदी नाही !

लोणावळा : लोणावळा शहरासह मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. दरम्यान या आदेशानंतर लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळे बंद केल्याची चर्चा होत आहे. परंतु ही माहिती खरी नसून लोणावळा शहरासह मावळ परिसरातील पर्यटनस्थळे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले प्रतिबंधात्मक आदेश हे काही ठिकाणांकरिता आणि पर्यटकांनी पर्यटन करताना घ्यायची काळजी, याबाबत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला असून अवकाळी पावसाला जोडून झालेल्या मान्सून पावसाने लोणावळा शहरासह मावळचा परिसर निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मावळ परिसरात पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे. दरम्यान रविवारी भुशी धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सुरक्षित पर्यटनाच्या अनुषंगाने लोणावळा शहरासह मावळसाठी प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली आहे.
लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर ठिकाणी करायच्या नियमांच्या पालनासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
आदेशाचा चुकीचा अर्थ आणि पर्यटनावर परिणाम
सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळा ग्रामीण भागातील काही पर्यटन स्थळांवर जिल्हाधिकारी यांनी काही प्रतिबंध जाहीर केले. मात्र या प्रतिबंधांचा अर्थ बंदी असा चुकीचा घेत काही माध्यमांकडून तशा बातम्या आणि सोशल मीडियावर तशा स्वरूपाची चुकीची माहिती प्रसिद्ध झाली. याचा मोठा फटका लोणावळा शहरातील पर्यटनावर बसला. गेली दोन दिवसांपासून शहरातील पर्यटन संख्या घसरली आहे. तसेच येथील हॉटले व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे.
लोणावळा परिसरातील तसेच तालुक्यातील बहुतेक पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली अशी चुकीची माहिती दाखवली जात आहेत. त्याचा विपरीत परिणाम लोणावळा शहराच्या पर्यटन व्यवसायावर झाला आहे. येथील हॉटेल आणि टॅक्सी व्यवसायिकांकडे असलेल्या बुकिंगमधील जवळपास २५ टक्के बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच व्यावसायिक हतबल झाले आहेत.
– निखिल कवीश्वर, माजी नगरसेवक





