लोणावळा – लोणावळा शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणारा अट्टल घरफोड्या तसेच मोबाईल आणि दुचाकी चोरणारा सराइत चोरटा लोणावळा शहर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. हे दोन्ही गुन्हेगार पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, केलेल्या तपासात पोलिसांना त्यांच्याकडून अद्यापपर्यंत 3 लाख 31 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात यश आले आहे.
शंकर उर्फ हाड्या मधुकर पवार (वय 19, रा. सोमाटणे गाव, ता.मावळ, मूळ रा. पेनूर, जि. सोलापूर), अफजल उर्फ भुऱ्या शहाबुद्दीन शेख (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरासह अन्य ठिकाणी घरफोड्या करणारा अट्टल घरफोड्या शंकर उर्फ हाड्या याला क्राइम युनिट 1, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, पोलिसांकडून लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हाड्या पवार याचा शोध पुणे शहर, पुणे ग्रामीण, सोलापूर आणि अहमदनगर पोलीस गेल्या आठ महिन्यांपासून घेत होते. चाकण येथे एका घरफोडी प्रकरणात क्राइम युनिट 1 ने हाड्या याला जेरबंद केला होता. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने लोणावळा शहरात वेगवेगळ्या हॉटेल्स, लॉजिंग आणि बंगल्यांमध्ये घरफोड्या केल्याचे तसेच भुशी डॅम येथून एक कार चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून लोणावळा पोलिसांनी आतापर्यंत अडीच लाख रुपये किमतीची एक अलिशान मोटार, सोळा हजार रुपये किमतीचा एक 49 इंची एलईडी टीव्ही असा चोरीचा माल जप्त केला आहे.
दुसरा चोरटा अफजल उर्फ भुऱ्या शेख हा लोणावळा शहरातील कुसगाव येथे राहणारा असून, तो लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खून, चोऱ्या यासारखे अनेक गुन्हे भुऱ्या याच्यावर दाखल आहेत. भुऱ्या हा चोरीची दुचाकी घेऊन वावरत असल्याची खबर लोणावळा पोलिसांना होती. त्यामुळे मागील महिनाभरापासून लोणावळा शहर गुन्हे अन्वेषण पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. या पथकाने दिलेल्या खबरीनुसार क्राइम युनिट 5, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, पोलिसांनी भुऱ्या याला देहुरोड येथून ताब्यात घेत लोणावळा शहर पोलिसांच्या हवाली केले.
लोणावळा शहर पोलिसांनी भुऱ्या शेख याच्याकडून केलेल्या तपासात कल्याण येथून चोरलेली पन्नास हजार रुपयांची एक दुचाकी आणि लोणावळ्यातील एक बांधकाम साईटवर चोरलेला 15 रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. भुऱ्या याने अजूनही काही दुचाकी आणि मोबाईल चोरले असून, त्याचा तसेच पहिला आरोपी हाड्या पवार याने केलेल्या अन्य घरफोड्याचा तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस हवालदार सामील प्रकाश, पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस शिपाई मनोज मोरे, पवन कराड, अजीज मेस्त्री करीत आहेत.