Pune Zilla Parishad – पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष्य अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाहता अध्यक्ष याच पक्षाचा होणार हे स्पष्ट असले, तरी इच्छुकांची मोठी संख्या पाहता ही ‘माळ’ कोणाच्या गळ्यात पडते, यासंदर्भात जिल्हाभर चर्चा झडत आहेत. भोर तालुक्यातील कामथडी-भोंगवली गटातून निवडून आलेले विक्रम खुटवड यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत असून, ४४ वर्षांनंतर भोरचे स्वप्न पूर्ण होणार का, राजकीय वर्तूळात यासबंधी चर्चा रंगली आहे. शिवतरेंच्या पराभवामुळे समीकरणे बदलली निवडणूक काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला होता. मात्र, शिवतरे यांचा पराभव झाल्याने भोरची ही संधी हुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड यांनी विजय मिळवल्याने भोरचा दावा अद्याप कायम असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. विक्रम खुटवड हे भोंगवली-कामथडी गटातून निवडून आले आहेत. पक्षनेतृत्व आता निष्ठा आणि अनुभवाचा विचार करून भोरला ही संधी देणार की अन्य तालुक्याचा विचार होणार, हे पाहणे औत्सूक्याचे ठरेल. ४४ वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटल्याने भोरमधील कार्यकर्त्यांमध्ये ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी भावना निर्माण झाली आहे. १९८२ नंतर संधीची प्रतीक्षा तालुक्याच्या पूर्व भागातील टापरेवाडी येथील भोर पंचायत समितीचे माजी सभापती, राज्य सहकारी बँक, भू-विकास बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकार महर्षी दिवंगत माधवराव टापरे तालुक्यातून १९८२ साली पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. टापरे यांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर गेल्या चार दशकांहून अधिक काळ भोरला या मानाच्या पदाने हुलकावणी दिली आहे. रणजित शिवतरे हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, पण त्यांच्या पराभवानंतर आता विक्रम खुटवड यांच्या रूपाने पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.