nagar | अवैध कत्तलखाने जमीनदोस्त

कोपरगाव, (प्रतिनिधी) – शहरातील संजयनगर, आयेशा काॅलनी भागातील अवैध कत्तलखाने, अतिक्रमणे आज कोपरगाव नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तिकरित्या केलेल्या धडक कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले. या धडक कारवाईचे सकल हिंदू समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सोमवारी संजयनगर,आयेशा काॅलनी या भागात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने काटवनात जनावरे बांधून ठेवण्यात आली होती. सहा जनावरे व पाचशे किलो गोमांस जप्त करण्यात आले होते.
या ठिकाणी दोन गोवंश जातीच्या जनावरांची धारदार शस्त्राने कत्तल करण्यात आली होती. त्याचे व्हिडिओसह फोटो व्हायरल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी शकील बागवान नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
शहरातील मध्यवर्ती भागात वारंवार गोवंश कत्तल केली जात असल्याने सकल हिंदू समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या जातात. अखेर बुधवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून निषेध करून २४ तासाच्या आत अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करावे, अशी जोरदार मागणी नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे केली.
त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगरपालिका प्रशासन, अतिक्रमण विभाग व शहर पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाच्या मदतीने कडक बंदोबस्तात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने अवैध कत्तलखाने,काटवण जमीनदोस्त केले.
या कारवाईच्या वेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह दंगल नियंत्रण पथक अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कोपरगाव नगरपालिकेचे वीस कर्मचारी, नगररचना विभागाचे तीन अधिकारी यांच्यासह दोन ट्रॅक्टर व दोन जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिली





