Koyna Dam Accident : पोहण्याचा मोह जीवावर बोतला! कोयना धरणात तरुणाचा बुडून मृत्यू; नेमकं काय घडलं?
Koyna Dam Accident : महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित; कोयना जलाशयाजवळ पर्यटनासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला.

Koyna Dam Accident – तालुक्यातील वानवली परिसरातील कोयना जलाशयाजवळ संकेत विठ्ठल जाधव (वय २४, रा. सोनवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) २४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा घटना शनिवारी (दि. ४) रोजी सकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संकेत मित्रांसोबत सकाळी फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) वानवली परिसरात आला होता. फिरून झाल्यानंतर तो कोयना जलाशयाजवळ बसला.
त्यानंतर पाण्यात पोहण्यासाठी उतरला. पोहता येत असूनही तो पाण्यात ५० ते ६० फूट आत गेला. परत किनाऱ्याकडे येताना अचानक त्याचे हातपाय हालणे बंद झाले आणि तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या मित्रांनी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढून सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेद्वारे महाबेळश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांबळे तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पर्यटक व नागरिकांनी पाण्यात उतरताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





