Nagar | वीर एकलव्य पुतळ्याची जागा ठरली

कोपरगाव, (प्रतिनिधी): – भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी अनेक वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील आदिवासी बांधवांची मागणी होती.
त्या मागणीची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात धारणगाव रोडला भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे.
कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज असून, या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा, या मागणीबाबत आ.आशुतोष काळे यांनी त्यांना पुतळा उभारण्याचा शब्द दिला होता. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निधीची मागणी देखील केली आहे.
त्याबाबत मंगळवारी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्यासमवेत आदिवासी बांधवांसह सविस्तर चर्चा करून भगवान वीर एकलव्य यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांशी चर्चा करताना आ.काळे यांनी सांगितले की, . आदिवासी बांधवांना मी शब्द दिला होता की, मी भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणार. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करून आज पुतळ्यासाठी कोपरगाव शहरात जागा निश्चित करण्यात आली आहे.
त्यासाठी शासन दरबारी तब्बल एक कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केलेला असून, त्याबाबत माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
या निधीतून आदिवासी समाज बांधवांना अपेक्षित असलेला भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारू,अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली. या उपस्थितीत आदिवासी बांधवानी आदिवासी समाजाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले.
आ. काळे यांनी आमच्या भावना जाणल्या व आमची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीने बैठक घेवून भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा देखील निश्चित केली आहे.
त्यामुळे आ. काळेंच्या पाठीशी समाज उभा राहील, अशी ग्वाही एकलव्य युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पवार यांनी केली.





