Nagar : बेकायदा कत्तलखाने व पक्क्या घरावर पालिकेने फिरवला जेसीबी

कोपरगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गेल्या दोन दिवसांपासून सुरू केली. मात्र, शनिवारचा दिवस अनेकांना धडकी भरवणारा ठरला. पालिका प्रशासनाने थेट पक्के घरं ,व्यापारी संकुल व बेकायदा कत्तलखान्यावर अचानक जेसीबी फिरवून काही क्षणात होत्याचे नव्हते केले.
शनिवार दिवसभर अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. संजयनगर ते बैल बाजार रोड या परिसरातील अनेक घरावर जेसीबी फिरवला. अतिशय चिवळ झालेला हा रस्ता आता मोकळा करण्यात आला. या रस्त्याच्या कडेला अनेक पक्के घरे होती. तसेच याच भागातील आयेशा काॅलनी येथील बेकायदा कत्तलखाने चालू होते. वारंवार पोलीस कारवाई करून गोमांस पकडले जायचे पण दैनिक प्रभातने वृत्तमालिका लावून यावर लक्ष वेधल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बेकायदा कत्तलखाने बंद केली होती. अतिक्रमण मोहिमेच्या पथकांनी खास करून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पुढाकाराने संबंधीत कारवाई झालेले कत्तलखाने जेसीबी लावून उद्ध्वस्त केले.
तहसीलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सुहास जगताप, निवासी तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते, नगररचना विभागाच्या सहाय्यक नगररचनाकार अश्विनी पिंगळ व संबंधीत विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकवटून ही मोहीम हाती घेतल्याने अनेक अतिक्रमणे नेस्तनाबूत करण्यात यश आले. शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळाच्या जवळील अरशी काॅम्पलॅक्स या मोठ्या चार मजली पक्क्या इमारतीचा थेट एक मजलाच पाडण्यात आल्याने कोपरगावमधील बेकायदा इमारती बांधणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
संबंधीत इमारतीच्या मालकाने आपल्या तीन मजली व्यावसायिक इमारतीवर बेकायदेशीर चौथा मजला थाटून व्यायाम शाळा सुरू केली होती. नागरिकांच्या अनेक तक्रारीवरून अखेर आज त्या इमारतीचा वरचा मजला व खालची पार्किंग पालिका प्रशासनाने नेस्तनाबूत करून बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्यावर अशीच कारवाई येत्या काळात करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिला. मुख्याधिकारी जगताप म्हणाले की, यापुढे कोणतेही बेकायदा अतिक्रमण अथवा विनापरवाना बांधकाम खपवून घेतले जाणार नाही. ज्यांनी कोणी आपल्या मालकीच्या जागेत अथवा शासकीय जागेत अनाधिकृत बांधकाम केले असेल त्यांनी त्वरीत काढून घ्यावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही संबंधीत बांधकाम पाडणार आहोत. तसेच बांधकाम पाडण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च त्या त्या व्यक्तीच्या नावे टाकून वसूल केला जाणार आहे. पालीका प्रशासनाला अनाधिकृत बांधकामे पाडण्याची वेळ येऊ न देता त्वरीत बांधकाम काढून घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभर शहरातील टाकळी नाका ते गोदावरी पेट्रोल पंप, बैल बाजार रोड ते संजयनगर , एसजी विद्यालय ते कन्या शाळा तसेच शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केले. काही ठिकाणी नागरिकांनी स्वत: होवून अतिक्रमण काढून घेतले होते तर काहींनी जाणुनबुजून अतिक्रमण काढले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरावर व दुकानावर जेसीबी फिरवण्यात आला.रविवारचा दिवस विश्रांती घेऊन पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण मोहीम यापेक्षा अधिक कडक करण्याची तजवीज स्थानिक प्रशासनास करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.





