जुन्नरमधील अवैध कत्तलखान्यांमुळे खळबळ! BJP, VHP पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, कठोर कारवाईची मागणी

ओझर : जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यांमुळे सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय समस्या गंभीर बनल्या आहेत. या कत्तलखान्यांमुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्यांसह धार्मिक भावना दुखावण्याचे आणि कायद्याचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना भारतीय जनता पार्टी (BJP) युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील अवैध कत्तलखान्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. या सर्व बेकायदेशीर कत्तलखाने त्वरित बंद करावीत आणि संबंधित यंत्रणांमार्फत कसून चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे गणेश कवडे, विश्व हिंदू परिषदेचे हर्षवर्धन कुऱ्हे, बेल्हे गावचे उपसरपंच राजू पिंगट, बजरंग दलाचे संकल्प विश्वासराव, विश्व हिंदू परिषद शाखेचे शंकर शिंदे, डॉ. दत्ता खोमणे, साईकृपा पतसंस्थेचे निवृत्ती बाबुराव गटकळ, बेल्हे बजरंग दल शाखेचे निलेश शिरतर, गणेश शिरफाळे, किशोर पिंगट आणि रोहित जगताप उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी या कत्तलखान्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत. आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून या प्रकरणी तातडीने चौकशी आणि कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत याबाबत प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





