Nagar : कोपरगावात दोन हजार किलो गोमांस पकडले

कोपरगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात बेसुमार गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचे कोपरगाव तालुका पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघड केले. कोपरगावात दोन हजार किलो गोमांससह एक पिकअप गाडी पकडण्यात आली. शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लासूर येथील एका पेट्रोल पंपावर एक महिंद्रा कंपनीची पिक अप गाडी आली. ती गाडी मोबिल अब्दुल हसन शेख (रा. इतफाक चाळ नं. २, कुरेशीनगर कुर्ला मुंबई) यांच्या ताब्यात देण्यात आली.
गाडीमध्ये दोन हजार किलो गोवंश जातीचे मांस बर्फाच्या लाद्यामध्ये ठेवण्यात आले. गाडीच्या बाहेर रिकामे टोमॅटोचे कॅरेट रद्दी पेपर लावून टोमॅटो भरल्याचे वाटेल, असे लावले. गाडी गोमांस घेऊन समृध्दी महामार्गावरून सुसाट मुंबईच्या दिशेने वैजापूरमार्गे निघाली. गाडी गोमांसने भरून निघाल्याची खबर थेट गुजरातला पोहचली. गुजरातच्या प्राणीन फौंडेशनने कोपरगावच्या कार्यकर्त्यांना कळवले.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही खबर कळताच कोपरगाव येथील टोल नाक्यावर ७ कार्यकर्ते दबा धरून बसले . एका चारचाकी गाडीत ५ कार्यकर्ते गाडीचा पाठलाग करण्याच्या तयारीत असताना गोमांसने भरलेली पिकअप कोपरगाव येथून जात असताना पोलिसांच्या सहकार्याने रात्री पावणे बारा वाजता पाठलाग करून गाडी पकडण्यात आली. गाडीची पोलिसांनी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी झाडाझडती घेतली असता टोमॅटो भरल्याचे भासवणाऱ्या गाडीत चक्क दोनशे किलो गोमांस आढळून आले.
सदरची गाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन वैभव रविंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून मोबिल अब्दुल हसन शेख याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्याच्या ताब्यातील गाडी (एमएच ४८ बी एम ८९७३) ही अंदाजे किंमत अडीज लाख रुपये व २ हजार किलो गोमांस अंदाजे किंमत दोन लाख रुपये ,असा ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत त्याला गजाआड केले. हे गोमांस नगरपालिकेच्या सहकार्याने दफन करण्यात आले.





