Illegal Hoardings Pune : अनधिकृत होर्डिंगविरोधात पुन्हा कारवाई; तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती
Illegal Hoardings Pune : पहिल्याच दिवशी पथकाने पाडले ७ अनधिकृत होर्डिंग; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता आर्थिक कारवाईचा बडगा.

Illegal Hoardings Pune – शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पाच विशेष पथकांची नियुक्ती केली असून, या पथकांमार्फत शहरभर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. परवानगीशिवाय लावलेले होर्डिंग, नियमांचे उल्लंघन करणारे, तसेच दिलेल्या आकारमानापेक्षा मोठ्या मापाचे फलक यांच्यावर कारवाई करून ते निष्कासीत केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
या पथकांकडून तपासणीदरम्यान होर्डिंगच्या ठिकाणी परवानगीचा बोर्ड लावलेला आहे किंवा नाही, मंजूर परवानगीप्रमाणेच माप ठेवले आहे का, तसेच इतर जाहिरात नियमांचे पालन झाले आहे का, याची सखोल पाहणी केली जाईल. तपासणीत अनधिकृत होर्डिंग आढळून ते तात्काळ निष्कासित करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील आर्थिक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित होर्डिंग कोणत्या वर्षापासून अस्तित्वात होते, याचा तपास गुगल इमेजच्या आधारे करण्यात येणार आहे.
त्याप्रमाणे संबंधित होर्डिंगधारकांकडून दंडासह परवाना शुल्क वसूल केले जाणार आहे, तसेच होर्डिंग निष्कासनासाठी येणारा सुमारे दोन लाख रुपये इतका खर्चही संबंधितांकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. या मोहिमेअंतर्गत आज हडपसर भागात एका पथकाने तपासणी केली. त्यामध्ये एकूण ३० होर्डिंगची पाहणी केली. त्यापैकी सात होर्डिंग अनधिकृत आढळले.
ते काढून टाकण्यात आले. शहरातील वाहतूक सुरक्षितता, नागरिकांची सुरक्षितता, तसेच सौंदर्यदृष्टी राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, पुढील काळात शहरातील इतर भागांतही अशीच कठोर तपासणी आणि कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने स्पष्ट केले.





