‘पळून गेलास तर गोळी घालीन’; खेळण्यातील पिस्तूल दाखवून करायचा लूटमार..शेवटी पोलिसांनी केला असा अटक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लूटणाऱ्या चोरट्याला बाणेर पोलिसांनी अटक केली. श्रीराम विकास हानवते (वय ३३, रा. एलिगंट रेसीडन्सी, यमुनानगर, निगडी) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे.याप्रकरणी किसनकुमार पोरराराम ध्रुव ( २७,रा. पाषाण) याने बाणेर ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो मूळचा छत्तीसगडचा असून बाणेरच्या पारपत्र कार्यालयाजवळ १९ ऑक्टोबर रोजी त्याला हानवते याने पोलिस असल्याची बतावणी करुन लुटले होते.
धुव्र आणि मित्राने दिवाळीनिमित्त एटीएममधून आठ हजार काढले होते. तेथे हानवते दुचाकीवरुन आला. त्याने खाकी रंगाचे जॅकेट घातले होते. पोलिसांसारखे बुटही घातले होते. त्याने या दोघांना अडवले, पोलीस असल्याची बतावणी करत तुम्ही चोरी केल्याचे सांगितले. तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून हानवते आधारकार्ड मागितले, पळण्याचा प्रयत्न केला तर गोळी घालण्याची धमकी दिली. दोघांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दोघांकडील १३ हजारांची रोकड लांबवून तो पसार झाला.
घाबरलेला ध्रुव आणि मित्राने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, उपनिरीक्षक संदेश माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली. प्राथमिक तपासात हानवतेने परराज्यातील कामगारांना पोलीस असल्याची बतावणी करुन लूटमार केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.
खेळण्यातील पिस्तूलाने धमकावले..
हानवते दुचाकीवरुन पसार झाला होता. एका दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढून ताब्यात घेतले. त्याने धमकावण्यासाठी खेळण्यातले पिस्तूल वापरले होते. आरोपी हानवते हा सराइत आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एटीएमची तोडफोड करणे, चोरीचा प्रयत्न, तसेच निगडी ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल आहे.





