जातीयवाद नसता तर फुले दाम्पत्याला लढण्याची गरज का पडली असती? अनुराग कश्यपचा सवाल, थेट पोस्ट अन्…

Anurag Kashyap | ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, ऐनवेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता नव्या तारखेनुसार फुले चित्रपट २४ एप्रिल रोजी रिलीज करण्यात येणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रात फुले चित्रपटातील काही सीन्सवर मोठा वाद निर्माण झाला होता.
सेन्सार बोर्डाने चित्रपटातील काही सीन्स हटवण्यात यावे असे सांगितले असल्याची माहिती आहे. आता या वादात हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याने सेन्सार बोर्डावर ताशेरे ओढत आपली नाराजी व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. याविषयीची पोस्ट त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे.
या लांबलचक लिहिल्या पोस्टमध्ये अनुरागने फुले चित्रपटाबाबत सेन्सॅारशिपच्या मुद्यांवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच सरकारलाही थेट प्रश्न विचारले आहेत. अनुरागने लिहिले, ‘माझ्या आयुष्यातील पहिले नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर होते. भाऊ, जर या देशात जातीयवाद नसता तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना लढण्याची गरज का पडली असती? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. आता एका समुदायाच्या लोकांना लाज वाटत आहे किंवा भारतात एक वेगळा समुदाय आहे. आम्हाला दिसत नाहीये, मूर्ख कोण आहे, कृपया कोणीतरी समजावून सांगा? असे देखील अनुराग म्हणाला आहे.
आरशात पाहून त्यांना लाज वाटत असेल
अनुरागचा असा विश्वास आहे की ‘फुले’ हा अशा अनेक चित्रपटांपैकी एक आहे जो त्याच्या धाडसी आणि स्पष्टवक्त्यांमुळे दडपशाहीचा सामना करत आहे. ‘पंजाब ९५’, ‘टीस’, ‘धडक २’ यासारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करत या चित्रपटांना अस्वस्थ सत्ये दाखवण्यासाठी लक्ष्य केले जात आहे. पुढे अनुरागने लिहिले आहे की, ‘या जातीयवादी, प्रादेशिकवादी, वंशवादी सरकारचा अजेंडा उघड करणारे आणखी किती चित्रपट ब्लॉक केले गेले आहेत हे मला माहित नाही. आरशात स्वतःचा चेहरा पाहून त्यांना लाज वाटते, असा घणाघात त्याने व्यक्त केला.





