– प्रा. डॉ. धनंजय लोखंडे ‘सावित्रीबाई या महात्मा फुलेंच्या पत्नी आहेत एवढीच फक्त त्यांची ओळख नाही; महाराष्ट्रातल्या स्त्री-मुक्ती चळवळीतल्या त्या आद्य प्रणेत्या आहेत’ अशा शब्दांत प्रा. गं. बा. सरदार यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी. त्यानिमित्त… स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या कैवारी इत्यादी उपाधी देऊन त्यांना संबोधतो. त्या युगस्त्री तर होत्याच, शिवाय त्या थोर सत्यशोधक आणि एक भारतीय स्त्री रत्न होत्या. पहिल्या भारतीय प्रशिक्षित शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव, ता. खंडाळा जि. सातारा येथे झाला. त्यांचा विवाह 1840 या वर्षी झाला. जोतीरावांनी सावित्रीबाईंना शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. फेरार आणि मिसेस मिचेल यांनी त्यांना प्रशिक्षित केले. 1947 या वर्षी सावित्रीबाईंनी ‘अध्यापक ट्रेनिंग’ अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘महिला सेवा मंडळा’ची स्थापना सावित्रीबाईंनी क्रांतिबा फुले यांचे मार्गदर्शनाखाली स्त्रीयांची सुधारणा करण्यासाठी 1850-51 यावर्षी केली. स्वतः या मंडळाच्या सावित्रीबाई सचिव होत्या. पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी इ. सी. जोन्स या मंडळाच्या अध्यक्षपदी होत्या. जानेवारी 1852 मध्ये मंडळानी मोठ्या प्रमाणात तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत, 13-1-1852 रोजी पुणे कलेक्टर साहंबांच्या पत्नी मिसेन्स जोन्स यांचे अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगूळ समारंभ होणार आहे. तरी सर्व स्त्रियांनी आपल्या लेकी-सुना घेऊन यावे. समारंभ सायंकाळी 5 वाजता आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच आजमावर बसतील. जातीभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरून हळदीकुंकू लावण्यात आणि तिळगूळ वाटण्यात येईल. असा उल्लेख असून शेवटी सौ. सावित्रीबाई भ्रतार जोतीराव फुले, सेक्रेटरीज, महिला सेवा मंडळ असा उल्लेख आहे. यातून जातिभेद विरहीत जगण्याचा आणि जातीनिर्मूलनाचा संदेश दिला आहे. विधवा स्त्रीयांनी आत्महत्या करू नये आणि बालहत्या होऊ नये म्हणून 1863 या वर्षी जोतीरावांनी स्वतःच्याच घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली; या गृहाच्या चालिका होत्या सावित्रीबाई. तरुण विधवांना हे गृह म्हणजे फार मोठा आधार होता. 1873 यावर्षी काशिबाई नावाच्या स्त्रीचे बाळंतपण करून, तिच्या मुलाचे ‘यशवंत’ असे नामकरण करून फुले दांपत्याने त्याला दत्तक घेतले. हालअपेष्टा सहन करून वैद्यकीय शिक्षण दिले. 4 फेब्रुवारी, 1889 या वर्षी सकाळी 9.30 वाजता दत्तकपुत्र डॉ. यशवंत यांचा विवाह सत्यशोधक ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी राधा (लक्ष्मी) हिच्याबरोबर सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. यावेळी जोतीराव पक्षाघाताने आजारी होते त्यामुळे या विवाहाची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाई यांनी स्वीकारली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर, 1873 रोजी झाली; त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी म्हणजे 25 डिसेंबर, 1873 रोजी पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह सावित्रीबाई यांच्या पुढाकाराने झाला. या विवाहाचा निम्म्यापेक्षा जास्त खर्च (रुपये पंधरा) सावित्रीबाई यांनी केला. हा विवाह सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ग्यानोबा निंबाळकर यांची मुलगी राधा हीचा सीताराम बजाजी आल्हाट यांच्याशी संपन्न झाला. या सर्व बाबींचा त्रास सावित्रीबाईंना झाला. 1877 या वर्षी पडलेल्या दुष्काळात सत्यशोधक समाजाच्या वतीने क्षुधानिवारण केंद्र चालविण्यात आली. पुण्यात धनकवडी येथे व्हिक्टोरिया आश्रमात एक हजार पीडितांना दररोज दुष्काळ संपेपर्यंत भाकरी वाटण्यात आल्या. या अन्नछत्रांची जबाबदारी संपूर्णपणे सावित्रीबाई यांच्यावर होती. याच काळात जुन्नर तालुक्यातील ओतुर येथेही सत्यशोधक समाजाच्या वतीने दुष्काळ निवारण केंद्र उभारण्यात आले होते. या काळात सावित्रीबाई फुले ओतुर येथे वास्तव्यास होत्या. यावेळी ओतुर भेटीवर आलेल्या जिल्हाधिकार्यांकडून सावित्रीबाई यांनी 16-17 क्विंटल ज्वारी (जवळपास चार बैलगाड्या धान्य) मदत ओतुर केंद्रात उपलब्ध करून घेतली होती. सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद 1891 मध्ये समर्थपणे सांभाळले. सन 1893 मध्ये सासवड येथे सत्यशोधक समाजाची विसावी परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाई यांनी भूषविले होते. यावेळी त्यांनी प्रतिगामी शक्तींना कडाडून विरोध करून चांगलेच ठणकावले होते. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले साहित्य हे केवळ साहित्य नाही तर माणसाला माणूसपण देण्याचा संदेश आहे. त्यात 1) काव्यफुले- कवितासंग्रह 2) जोतिबांचे भाषणे- संपादक- सावित्रीबाई फुले 3) सावित्रीबाईंची जोतिबांस पत्रे 4) बावनकशी सुबोध रत्नाकर- कवितासंग्रह 5) मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे, याचा उल्लेख करता येईल. ‘काव्यफुले’ मध्ये 41 कविता असून त्या सामाजिक, ऐतिहासिक आणि निसर्गविषयक कविता आहेत. जोतिबांच्या भाषणांचे शब्दांकन चार्लस जोशी यांनी केले आहे. ओतुर आणि नायगावहून सावित्रीबाईंनी जोतीरावांना लिहिलेली तीन पत्र आहेत. उद्योग, व्यसने, सदाचरण, विद्या इत्यादी विषयांवरील ‘मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे’ नारो बाबाजी महाघट-पाटील यांनी संपादन केले आहे. बावनकशी सुबोध रत्नाकरमध्ये सलग 52 रचना आहेत. जोतीरावांच्या कार्याचे चित्रण आणि देशाचा इतिहास काव्यरूपाने मांडला आहे. सुमारे पन्नास वर्षांपेक्षा खडतर प्रवास करित, प्रतिकूल परिस्थितीला सामारे जाऊन अखंडपणे जोतीरावांना साथ देऊन, केवळ महिलांच्याच नाही तर अखिल मानवजातीला मानवतेचा हक्क देऊन, प्लेगच्या साथीमध्ये शेवटपर्यंत रुग्णांना मदत करून, त्यातच प्लेगच्या बाधेने 10 मार्च 1897 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.