IND vs ENG : ध्रुव जुरेलला पंतच्या जागी फलंदाजी करता येणार का? काय आहे आयसीसीचा नियम? जाणून घ्या

IND vs ENG Dhruv Jurel replace Rishabh Pant : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथील कसोटीतील पहिल्या दिवशी दुखापत झाली. ख्रिस वोक्सच्या वेगवान गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात यॉर्कर चेंडू थेट पंतच्या पायाला लागला. इंग्लंडने पायचित (LBW) साठी डीआरएस घेतला. पंत बाद होण्यापासून वाचला, पण तो चालण्याच्या स्थितीतही नव्हता. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. आता अहवालानुसार, फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
ध्रुव जुरेल यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार –
ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टिरक्षण करणार आहे. यापूर्वी लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यानही पंतला दुखापत झाली होती. तेव्हा जसप्रीत बुमराहच्या चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. ही घटना सामन्याच्या पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रात घडली होती. त्यानंतर संपूर्ण सामन्यात ध्रुव जुरेलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. आता पुन्हा एकदा 24 वर्षीय जुरेल यष्टिरक्षणाची भूमिका निभावणार आहे.
ध्रुव जुरेलला फलंदाजी करता येणार का?
Dhruv Jurel is set to play the 5th Test against England. [Abhishek Tripathi]
– Ishan Kishan as Backup option. pic.twitter.com/aHxz6hly57
— Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2025
लॉर्ड्स येथे पंतची दुखापत गंभीर नव्हती, त्यामुळे त्याने दोन्ही डावांत फलंदाजी केली होती. पण आता फ्रॅक्चर असून तो चालण्यासही असमर्थ आहे. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल किंवा दुसऱ्या कोणाला त्याच्या जागी फलंदाजीची संधी मिळेल का? याचे उत्तर आहे – नाही. ध्रुव जुरेल पंतच्या जागी यष्टिरक्षण करू शकतो, पण फलंदाजी करू शकणार नाही. याचे कारण आहे आयसीसीचा नियम. आयसीसीच्या नियमानुसार, केवळ डोक्याला दुखापत झाल्यासच संघाला खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बदलण्याची परवानगी मिळते. शरीराच्या इतर भागाला दुखापत किंवा फ्रॅक्चर झाल्यास बदली खेळाडू मिळत नाही.
काय आहे आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नियमानुसार, “कोणताही बदली खेळाडू गोलंदाजी, फलंदाजी किंवा कर्णधारपद भूषवू शकत नाही. केवळ पंचांच्या परवानगीने तो यष्टिरक्षकाची भूमिका निभावू शकतो.” 2017 पर्यंत बदली यष्टिरक्षकाचा नियमही नव्हता. नंतर एमसीसीने गंभीर दुखापत किंवा आजाराच्या परिस्थितीत बदली यष्टिरक्षकाचा नियम आणला, पण यासाठी पंचांची परवानगी आवश्यक आहे. याशिवाय, खेळाडूला कोविड झाल्यास त्याला बदली खेळाडू मिळू शकतो.





