ICC Rankings ODI Allrounders : भारतीय क्रिकेट संघ सध्या ODI आणि T20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन टीम आहे, तर टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये एक असा फॉरमॅट आहे ज्यामध्ये टीम इंडिया वैयक्तिक खेळाडूंच्या क्रमवारीत मागे पडल्याचे दिसून येत आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर टॉप-10 यादीत एकही भारतीय खेळाडू नाही.
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर भारताकडे सध्या रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्यासारखे जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. रवींद्र जडेजा सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे, जो जागतिक क्रमावारीत 13व्या स्थानावर आहे. आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे जडेजाशिवाय टॉप-20 अष्टपैलूंच्या यादीत दुसरा कोणताही भारतीय खेळाडू नाही.
या यादीत हार्दिक पांड्या 22 व्या स्थानावर आहे. 50 हून अधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा अक्षर पटेल या यादीत कुठेही दिसत नाही. तो टॉप-50 मध्येही नाही. या यादीत अव्वल स्थानावर आहे अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी, ज्याने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारतीय खेळाडूंची अवस्था वाईट का?
एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये भारताच्या अष्टपैलू खेळाडूंच्या खराब क्रमवारीचे एक मुख्य कारण म्हणजे टीम इंडियाने 2024 मध्ये फक्त 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. हे तीन एकदिवसीय सामने ऑगस्ट महिन्यात खेळले गेले होते, ज्यामध्ये भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीवर नजर टाकली तर टॉप-10 मध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. रोहित शर्मा (दुसरा), शुभमन गिल (तिसरा) आणि विराट कोहली (चौथा) यांचा समावेळ आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये, जगातील नंबर-1 संघाचे तीन गोलंदाज सध्या टॉप-10 मध्ये आहेत. यामध्ये कुलदीप यादव (तिसऱ्या), जसप्रीत बुमराह (आठव्या) आणि मोहम्मद सिराज (दहाव्या) यांची नावे आहेत.